ओला-उबेर संपामुळे प्रवास भाड्यामध्ये मोठी वाढ, प्रवाशांची गैरसोय

पुणे : ओला-उबेर कॅब चालकांच्या राज्यव्यापी संपाचा फटका पुणे शहरालाही बसू लागला आहे. शुक्रवारी शहरात कॅब सेवा ठप्प झाल्याने अनेक नागरिकांना दुहेरी भाडे मोजूनही गाडी मिळवणं कठीण झालं होतं. ( Ola-Uber strike results in huge hike in fares inconvenience to passengers)

ओला, उबेरसारख्या अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांच्या भाडे नियंत्रण धोरणाविरोधात महाराष्ट्र कामगार सभेने पुकारलेल्या या संपामुळे पुणे विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानके, मेट्रो स्थानके, मार्केट यार्ड, बाणेर, बालेवाडी, हडपसर, वानवडी-कोंढवा, मुंढवा, हिंजवडी आदी भागांमध्ये कॅब उपलब्ध नव्हत्या. अनेकांनी विविध अ‍ॅप्सवरून बुकिंग करून पाहिलं, मात्र एकही कॅब उपलब्ध होत नसल्याचे पाहायला मिळाले.

या आंदोलनाचा फटका मुंबईत पाठोपाठ पुण्याच्या प्रवाशांना देखील बसला. अनेक ठिकाणी रिक्षाचालकही या आंदोलनात सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. काही भागांमध्ये तर ऑनलाइन रिक्षा भाड्यांमध्येही वाढ झाल्याचे अनुभवणं आल्याचे प्रवाशांनी सांगितले. विमानतळाजवळील एरोमॉलमधील कॅब पिकअप पॉईंटचे उपाध्यक्ष वाय. एस. राजपूत म्हणाले, “सध्या फक्त ५० टक्के कॅब पुरवठा उपलब्ध आहे. विमानतळावरील प्रवाशांची लगबग नुकतीच सुरू झाली आहे. पण कॅबची कमतरता जाणवते आहे.” तर, महाराष्ट्र कामगार सभेचे केशव क्षीरसागर यांनी ओला, उबेर आणि रॅपिडोसारख्या कंपन्या राज्यात अ‍ॅग्रीगेटर परवानगीशिवाय सुरू असल्याचा आरोप केला आहे.

क्षीरसागर यांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये काही मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने निश्चित केलेली दर प्रणाली लागू करणे, ई-बाईक टॅक्सी योजना रद्द करणे, तक्रारींची योग्य चौकशी न करता चालकांची ओळख बंद करण्याचा नियम रद्द करणे, नव्या टॅक्सी व रिक्षा परवान्यांवर मर्यादा घालणे आणि चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणे या मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान, बाबा कांबळे यांच्या ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि पुणे व पिंपरी चिंचवड विद्यार्थी वाहतूक संघटना यांनी या संपात सहभाग घेतलेला नाही. मात्र, पुणे पिंपरी चिंचवड विद्यार्थी वाहतूक संघटनेचे बापू भावे यांनी अ‍ॅग्रीगेटर अ‍ॅप्सवर मिळणाऱ्या कमी दरांविरोधात आवाज उठवला असून, काही मागण्यांना त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *