विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात सध्या मराठी – अमराठी वादातून काही ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. या घटना टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तोडगा सुचविला आहे. परप्रांतीयांना त्यांनी आवाहन केले आहे की त्यांनी सांगावं की, आम्ही महाराष्ट्रात राहतो. पण चांगलं मराठी बोलता येत नाही. तरी आम्ही मराठीचा आदर करतो. आमची भाषा हिंदी किंवा इंग्लिश आहे, पण आम्ही मराठी भाषा शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करू. (Ajit Pawars solution to the Marathi-Amrathi dispute if you dont know Marathitell me, I respect you I will learn)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी-अमराठी वाद सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे एका दुकानदाराने मराठी बोलणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्या दुकानदाराला मारलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यावर अजित पवार म्हणाले की, सगळ्यांनी आपापले भान ठेवून वागल आणि बोललं पाहिजे. प्रत्येक राज्यातली मातृभाषा महत्त्वाची असते. परंतु त्या मातृभाषेबरोबरच आपला भारत देश आहे. आपल्या भारतामध्ये प्रत्येक राज्याची मातृभाषा सोडल्यानंतर जर दुसरी कुठली भाषा चालत असेल तर ती हिंदी चालते. तसेच तिसरी भाषा कुठली चालत असेल तर इंग्लिश चालते. अशाप्रकारचं साधारण गणित आपण पाहत आहोत. जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पाहिलं तर सगळीकडे हीच परिस्थिती आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान, आदर आणि प्रेम असलं पाहिजे.
अजित पवार म्हणाले की, आपली मातृभाषा टिकली पाहिजे. आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, त्याबद्दल आपण पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. परंतु आता ज्या काही गोष्टी घडत आहेत. ते पाहता मला एवढंच सांगायचं आहे की, इथे राहणाऱ्या लोकांना जर मराठी बोलता येत नसेल तर त्यांनी सांगावं की, आम्ही महाराष्ट्रात राहतो. पण आम्ही चांगलं मराठी बोलता येत नाही. असे असले तरी आम्ही मराठीचा आदर करतो. आमची भाषा हिंदी किंवा इंग्लिश आहे, पण आम्ही मराठी भाषा शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करू. जर अमराठी लोकांनी एवढं म्हटलं तर काही गडबड होणार नाही. पण काही लोकं आम्ही मराठी बोलणार नाही, अशी अरेरावी करतात. पण ही गोष्ट महाराष्ट्रात चालणार नाही. आपण जिथे काम करत आहात, तिथले लोक कोणती भाषा बोलतात, त्यांचे विचार काय आहेत, या गोष्टीचा विचार करून हसत-खेळत एकमेकांसोबत राहिलं पाहिजे.
हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यपाल राजकीय भूमिका घेताना दिसत आहेत, असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, राष्ट्रपती आणि राज्यपाल ही आपल्या देशात व राज्यात महत्त्वाची पदं आहेत. राज्यपाल हे आमच्या वरचं पद आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही काही टीका टिप्पणी करणं योग्य नाही, असे मत अजित पवार यांनी मांडले.
