माजी एटीएस अधिकाऱ्याने केला काँग्रेसच्या षडयंत्राचा पर्दाफाश, मालेगाव स्फोट प्रकरणात सरसंघचालकांना अडकवण्याचे आदेश मिळाले होते असा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : २००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता या खटल्यावर नवा गौप्यस्फोट झाला आहे. तब्बल १७ वर्षांनंतर आलेल्या या निकालात सर्व सातही आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. त्यात प्रमुख आरोपी प्रज्ञा ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांचाही समावेश आहे. मात्र आता या प्रकरणात तपासाशी संबंधित असलेल्या माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. ( Former ATS officer exposes Congress conspiracy claims orders were received to implicate Sarsanghchalak in Malegaon blast case)

मुजावर यांनी दावा केला आहे की, “या स्फोट प्रकरणाच्या तपासादरम्यान मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना अटक करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी हा संपूर्ण प्रयत्न होता. त्या काळी एटीएस प्रमुख परमबीर सिंह आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हे आदेश आले होते.”

मुजावर यांनी सांगितले की, “या प्रकरणात माझा तपासात सहभाग फक्त हिंदू दहशतवाद ही खोटी थेअरी सिद्ध करण्यासाठीच करण्यात आला होता. भागवत यांना अडकवून हा स्फोट हिंदू दहशतवाद होता, हे ठसवण्याचा डाव रचला गेला होता. संशयित संदीप डांगे आणि रामजी कलसंगरा यांचा खून आधीच झाला होता, तरीही त्यांना आरोपपत्रात जिवंत दाखवण्यात आले. मला त्यांच्या लोकेशनचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले, जेव्हा मी हे चुकीचे आहे असे सांगितले, तेव्हा माझ्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.”

मेहबूब मुजावर यांनी या प्रकरणात आपल्या करिअरचे ४० वर्षे उद्ध्वस्त झाल्याचेही भावनिक वक्तव्य केले. “मी आदेशांचे पालन केले नाही, म्हणूनच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र मी न्यायालयात निर्दोष ठरलो. यामुळे आज सर्व आरोपी निर्दोष सुटल्याचा मला आनंद आहे. त्यामध्ये माझेही लहानसे योगदान आहे,” असे सांगून हिंदू दहशतवाद ही थेअरी खरी होती का? का केवळ राजकीय हेतूने तयार करण्यात आली होती? असा सवाल त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना केला आहे.

मालेगाव स्फोटाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र एटीएसच्या हाती होता. नंतर तो राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला. मेहबूब मुजावर हे एटीएसच्या तपास पथकाचा भाग होते. “त्या काळात मला दिलीप पाटीदार, संदीप डांगे, रामजी कलसंगरा आणि मोहन भागवत यांच्याबाबत गोपनीय सूचना देण्यात आल्या होत्या. ते सर्व अनुभव अत्यंत भयानक होते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *