विशेष प्रतिनिधी
पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून गायब झालेला गौतम गायकवाड हा तरुण अखेर सापडला आहे. गेल्या पाच दिवसांपासून पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून हा तरुण बेपत्ता झाला होता. मात्र कर्जबाजारी झाल्याने त्यानेच तानाजी कड्यावरून पाय घसरून पडल्याचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. ( Young Man Missing from Sinhagad Found Alive Faked Fall Due to Debt)
गौतम गायकवाड तानाजी कड्यावरून गायब झाल्यावर पुणे पोलिसांनी सीसीटीव्ही मार्फत त्या तरुणाचा शोध घेतला आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास गौतम सापडला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
गौतमवर मोठे कर्ज असल्यामुळे त्याने असा मार्ग अवलंबल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. सध्या त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढील चौकशी सुरू आहे. सिंहगड किल्ल्यावर असणाऱ्या तानाजी कडा येथून घसरून खोल दरीत पडल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना कळवलं होतं. तेव्हापासून गौतमला शोधण्यासाठी सिंहगड किल्ला आणि पायथ्याशी आपत्ती व्यवस्थापन, हवेली पोलीस प्रशासन तपास घेत होते. याच दरम्यान सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या एका सीसीटीव्हीमधून गौतम हा पळत आणि लपून जात असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे गौतम हा कड्यावरून पडला की त्याने स्वतःहून हा बनाव रचवला या संदर्भात पोलीस तपास करत होते. त्यानंतर आता त्याने हा बनाव रचल्याची माहिती समोर आली आहे.
काल सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांना दरीच्या एका भागात हालचाल जाणवली. त्यांनी तातडीने शोध घेतल्यावर गौतम गायकवाड जिवंत अवस्थेत आढळून आला.
