मराठा आरक्षणात फसवणूक केल्यास आंदोलन वेगळ्या स्टाइलने उभे राहणार, मनाेज जरांगे यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

जालना : मराठा समाजाच्या आरक्षणात फसवणूक केली, जर काही मागे-पुढे केले तर आपण दसऱ्यापर्यंत सांगितले आहे. नंतर मराठा समाजाचे आंदोलन वेगळ्या स्टाइलने उभे राहणार. पुन्हा सरकारला मान खाली घालूनच चालावे लागेल, महाराष्ट्रात मान कधीच वर काढू देणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
पत्रकारांशी बाेलताना जरांगे म्हणाले, सुविधा असो की नसोत आम्ही दसरा मेळावा घेणार आहोत. या मेळाव्यातच निर्णय घेणार आहोत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यावर शोध पत्रिका मागत असाल तर ओबीसीमध्ये असलेल्या जातींना 1994 मध्ये कशाच्या आधारे जी आर काढण्यात आला? एकसमान जाती नसून त्यांना आरक्षण कसे? केंद्रात ओबीसी असणाऱ्या जातींना राज्यात एसटीचा सुविधा कशा ?

जरांगे म्हणाले की, तुम्हाला मंत्री केले, तुमच्या डोक्यात जातीयवाद आहे म्हणून तुम्ही जर आमच्या कुणबी प्रमाणपत्र बोगस आहेत म्हणून शोध पत्रिका काढा म्हणून जर आरोळी ठोकीत असताल तर त्यांचे आरक्षण कशाच्या निकषावर दिले आहे, याची शोध पत्रिका निघावी आता याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे. यापुढे आता मोर्चे काढण्यापेक्षा जशाच्या तसेच घुसावे लागेल.यापुढे यांचेही बोगस आरक्षण आपल्याला शोधून काढावे लागणार आहे तो पर्यंत हे थंड पडणार नाही.

जरांगे म्हणाले की, ओबीसी आरक्षण उपसमितीची काल बैठक झाली त्यांना दिसायला हवे होते की काही जातींना केंद्रात ओबीसीमध्ये आरक्षण आहे, तर राज्यात SC-ST च्या सुविधा त्या कशा. मा. जज महोदय यांनी सरकारला प्रश्न विचारला होता की मराठा समाजाला दोन आरक्षण कसे, दोन तर नाहीयेत जर सरसकट मराठ्यांना आरक्षण दिले तर म्हणता येईल एसीबीसी पण पण अजून सरसकट आरक्षण देण्यात आलेले नाही. सरकारकडे कोर्टाने उत्तर मागवले आहेत तर सरकारने हे उत्तर दिले पाहिजे की मराठ्यांना दोन आरक्षण नाही पण काही जातींना केंद्रात ओबीसी आणि राज्यात एसटीमध्ये आहे हे दोन आरक्षण कसे काय? याचे सुद्धा उत्तर आम्हाला मिळणं गरजेचे आहे. 1994 नाचा जी आर कशाच्या आधारे दिला आणि काही जाती समान एक नसूनही त्यांना आरक्षण कसे काय याचे उत्तर आम्हाला दिले पाहिजे.

हैदराबाद स्टेट जेवढं होते त्यातील काही मराठा बांधवांना आज कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे असे ऐकले.ते कुणबी प्रमाणपत्र ज्यांना ज्यांना मराठवाड्यात मिळाले आहे त्यांनी उद्या आंतरवाली सराटीमध्ये यावे. मला बघूद्यात कोणचे दिले काय दिले नेमके सरकार काय करत आहेत. हैदराबाद गॅझेट आधारे दिले आहेत का हे बघायचे आहे? आजच्या प्रमाण पत्राचा उद्देश नेमका कोणता हे आज आम्हाला ठरवता येईल. ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांनी उद्या आंतरवालीमध्ये येणं गरजेचे आहे. तिथून पुढे आम्हाला समज गैरसमज दूर करता येईल आणि सरकारने काय ठरवले हे स्पष्ट करता येईल, असे जरांगे यांनी सांगितले.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे. दीड फुटापर्यंत शेतातील माती वाहून गेली आहे. मी अनेक ठिकाणी पाहणी केली आहे. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची गरज आहे, या विषयावर आपण कृषी मंत्र्यांशी चर्चा केली आहे. काही लोकांचे जनावरे वाहून गेले तर अधिकारी म्हणत आहे की वाहून गेलेले जनावर कुठे आहे त कसे सापडणार? वाहून गेलेले सापडत असते का? यावर सरकारने लक्ष देऊन शेतकरी सांगेल ती भरपाई दिली पाहिजे, अशी मागणीही जरांगे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *