विशेष प्रतिनिधी
पुणे: नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागातून दोघा बिगारी कामगारांनी ठेकेदाराच्या तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. त्यानंतर मुलीसह दोघेही गुजरातच्या दिशेने प्रवास करीत होते. मात्र विमानतळ पोलिसांनी तपास करून त्यांचे लोकेशन शोधले आणि कल्याण रेल्वे स्थानकातून दोघांना ताब्यात घेतले. ( Contractors three-year-old daughter kidnapped in anger over being fired from job)
प्रिन्स संजय पॉल (वय 21 ) आणि ओमनारायण छोटेलाल (वय 20, दोघेही रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर, पुणे, मुळ रा. बिहार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत शिवशंकर कुमार पृथ्वीचंद पासवान (वय 26) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पॉल आणि छोटेलाल हे दोघेही बिगारी मजूर आहेत. ते एका बांधकाम साईटवर मजुरीचे काम करीत होते. तर फिर्यादी पासवान हे त्यांचे ठेकेदार आहेत. आरोपी कामचुकारपणा करीत असल्याचे आढळल्याने पासवान यांनी दोघांनाही कामावरून काढून टाकले. त्याचा आरोपींना राग आला. त्यानंतर दोघा आरोपींनी ठेकेदार पासवान यांना धडा शिकवाचे ठरवले. त्यांनी विमाननगर येथील देवकर वस्ती येथून पासवान यांच्या तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण केले. मुलीचे अपहरण करून पासवानकडून पैसे उकळायचे अशी त्यांची योजना होती. मुलीला घेऊन ते ट्रेनमधून गुजरातला सुरत येथे त्यांच्या मित्रांकडे निघाले होते.
दरम्यान, मुलीचे अपहरण झाल्यावर पासवान यांनी विमानतळ पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पॉल आणि छोटेलाल यांनी कामावरून काढून टाकल्याच्या रागातून आपल्या मुलीचे अपहरण केले असावे अशी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गोविंद जाधव यांनी दोन वेगवेगळी पथके तयार केली. या पथकांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
असा लागला मुलीचा शोध
पोलिसांनी दोघा आरोपींच्या मोबाईलचे सीडीआर आणि लोकेशनची माहिती घेतली. त्यांचे लोकेशन सुरुवातीला तळेगाव दाभाडे दाखवत होते. पोलिसांनी तळेगाव दाभाडे पोलिसांशी संपर्क साधला. स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र त्यानंतर आरोपींची लोकेशन लोणावळा येथे असल्याचे समोर आले. त्यामुळे आरोपी मुलीला घेऊन ट्रेनने प्रवास करीत असल्याचे पोलिसांना समजले. उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या नेतृत्वाखाली एक पथक मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले.
कल्याण रेल्वे स्थानकावर आरोपींना घेतले ताब्यात
आरोपी इंद्रायणी एक्सप्रेस या ट्रेनने प्रवास करीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी रेल्वे पोलिसांना याबाबत कळविले. आरोपी आणि मुलीचा फोटो त्यांना देण्यात आला. कल्याण रेल्वे पोलिसांच्या मदतीने कल्याण रेल्वे स्थानकावर दोघा आरोपींना मुलीसह ताब्यात घेण्यात आले आणि सुखरूप तिला आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले. अवघ्या चार तासांत विमानतळ पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक प्रशांत माने तपास करीत आहे.
फिर्यादी हे ठेकेदार आहेत. त्यांनी आरोपींना नोकरीवरून काढून टाकले होते. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यांनी फिर्यादीला धडा शिकवण्याच्या हेतून त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण केले असे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी सांगितले.
