मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, कोकणाला रेड अलर्ट जारी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई, ठाणे, कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपायला सुरुवात केली आहे. हवामान विभागाने मुंबईसह, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे येत्या २४ तासांत या जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. ( Heavy rains in entire Maharashtra including Mumbai red alert issued for Konkan)

मराठवाड्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून नांदेड, लातूर, बीड, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे मुंबई लोकल वाहतूकीवर याचा परिणाम झाला आहे. रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 3 तासात मुंबई आणि ठाण्यासह 5 जिल्ह्यांमध्ये 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे आणि विजांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचसोबत तसेच नाशिक आणि पुणे घाट माथ्यावरही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रात्रभर मुसळधार पाऊस सुरु असल्याने मुंबईंमधील लोकल आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरु असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. मध्य रेल्वेकडून मुंबई विभागात आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मुंबई लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे.

मुंबईतील विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेंवर आज मेगाब्लॉक असणार आहे. ट्रान्सहार्बर मार्गावर देखील मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तसेच, पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे आधीच मुंबई लोकल उशिराने धावत आहे. त्यातच मुसळधार पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *