नव्या जीएसटी सुधारणांमुळे उत्सव काळात ग्राहक आणि व्यापाऱ्यांना दिलासा : सीए क्षितिज भुरके

डीसीएन न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र सरकारने केलेल्या नव्या जीएसटी सुधारणा आता देशातील कर प्रणाली अधिक सोपी आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने मोठे पाऊल ठरत आहेत. दूरदर्शन सह्याद्रीवरील विज्ञानम् जनहिताय या कार्यक्रमात अर्थतज्ज्ञ आणि सनदी लेखापाल क्षितिज भुरके यांनी या सुधारांची सविस्तर माहिती देत सांगितले की, यामुळे सामान्य ग्राहक, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

क्षितिज भुरके म्हणाले, “जीएसटी लागू झाल्यानंतर सुरुवातीला १, ३, ५, १२, १८ आणि २८ टक्के असे अनेक करदर असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. आता ५६व्या जीएसटी परिषद बैठकीत या करदरांचे साधीकरण करण्यात आले आहे. अत्यावश्यक वस्तूंवरील दर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहेत.”

दरकपातीमुळे ग्राहकांना दिलासा

दूध, पनीर, शेती अवजारे, इन्शुरन्स प्रीमियम आणि औषधे यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंवरील कर कमी झाल्याने सामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
“नवरात्री आणि दिवाळीसारख्या सणांच्या काळात ग्राहकांची खरेदी वाढते. कमी जीएसटी दरांमुळे त्यांच्या हातात अधिक पैसा राहील आणि त्यामुळे बाजारपेठेत चैतन्य येईल,” असे भुरके यांनी सांगितले.

भुरके यांनी पुढे नमूद केले की या सुधारणांचा टायमिंग अत्यंत योग्य आहे. गणपतीपासून डिसेंबरपर्यंतचा काळ हा देशातील व्यापाराचा सर्वात महत्वाचा काळ आहे. या दरकपातीमुळे किरकोळ बाजारपेठ, वाहन क्षेत्र आणि एफएमसीजी क्षेत्राला मोठा फायदा होईल.

व्यापाऱ्यांसाठी प्रक्रिया सुलभ

पूर्वी जीएसटी परताव्यासाठी व्यापाऱ्यांना ६० दिवस वाट पाहावी लागायची. आता ही मुदत ३० दिवसांवर आणण्यात आली आहे, ज्यामुळे व्यापाऱ्यांन रोख रक्कम वापरण्यासाठी मिळेल.“यामुळे छोट्या आणि मध्यम उद्योगांची (MSME) नवीन गुंतवणुकीची क्षमता मिळेल,” असे क्षितिज भुरके म्हणाले. त्यांनी सांगितले की सरकारने परताव्याची आणि रिटर्न फाइलिंगची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने आणखी सुलभ केली आहे.

महसूलात तूट टाळण्यासाठी नवा उपाय

दरकपातीमुळे महसूलात घट होईल अशी भीती व्यक्त केली जात असली तरी क्षितिज भुरके म्हणाले, “सरकारने लक्झरी वस्तूंवर ४० टक्क्यांचा नवीन स्लॅब लागू करून संतुलन राखले आहे.”
नोव्हेंबर २०२५ पासून कम्पेन्सेशन सेस बंद होणार असल्याने सरकारने योग्य वेळ साधून हा बदल लागू केला आहे. “दरकपातीमुळे ग्राहकांची खरेदी वाढेल आणि उद्योग क्षेत्र पुन्हा गती पकडेल,” असे त्यांनी सांगितले.

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊल

भुरके म्हणाले या सुधारणा ‘आत्मनिर्भर भारत’ या दिशेने पाऊल आहे. “कमी उत्पादनखर्च आणि सुलभ करप्रक्रिया यामुळे स्थानिक उत्पादनाला चालना मिळेल आणि देश आयातीवर कमी अवलंबून राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच आरबीआयची स्थिर आर्थिक धोरणे आणि ही जीएसटी सुधारणा एकत्रितपणे अर्थव्यवस्थेला स्थैर्य देतात, असे त्यांनी नमूद केले.

भविष्यातील परिणाम

या सुधारांचा परिणाम पुढील दोन तिमाहींमध्ये स्पष्टपणे दिसेल, असे क्षितिज भुरके यांनी सांगितले. “ऑक्टोबर ते मार्च दरम्यान सणासुदीचा आणि उत्पादनाचा काळ असतो. या काळात बाजारपेठेत खरेदीचा उत्साह वाढेल आणि उद्योगक्षेत्रालाही गती मिळेल,” असे त्यांनी मत व्यक्त केले.
“जीएसटी दरकपात आणि सुलभ प्रक्रिया या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने ग्राहक आणि व्यापारी दोघांच्याही फायद्याचे वातावरण निर्माण होईल. हे केवळ कर सुधार नाही तर अर्थव्यवस्थेवर विश्वास निर्माण करणारे पाऊल आहे,” असे सीए क्षितिज भुरके यांनी सांगितले.