डीसीएन न्यूज नेटवर्क
पुणे : ‘झेप्टो’ या डिलिव्हरी ऍपच्या माध्यमातून वस्तू पोचविणाऱ्या कंपनीच्या दहा ते बारा कामागारांनी एका ज्येष्ठ नागरिकाला धारदार हत्याराच्या धाकाने धमकावले. रस्त्यावर धिंगाणा घालू नका असे म्हटल्याच्या रागातून या टोळक्याने त्यांच्या अंगावर धावून जात दमदाटी केली. ही घटना गुरुवारी कोथरूडमधील मयूर कॉलनीमध्ये असलेल्या सरिता सहकारी सोसायटीच्या समोर घडली. ( Zepto Delivery Boys Run Riot in KothrudSenior Citizen Threatened at Knifepoint for Asking Them to Stop Shouting)
कोथरूड पोलिसांनी अज्ञात १० ते १२ जणांवर भारतीय न्याय संहिता १८९ (२), १९१ (२), १९१ (३), १९०, ३५२, ३५१ (२), ३ (५) शत्र अधिनियम १९५९ कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३ (९) (३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी कृष्णनाथ शरदचंद्र कुलकर्णी (वय ६१, रा. सरिता सहकारी सोसायटी, मयूर कॉलनी, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या सोसायटीशेजारी झेप्टो कंपनीचे गोदाम आहे. या गोदामामधील १० ते १२ मुले दहशत पसरविण्याचे हेतुने सोसायटीच्यासमोर वाढदिवस साजरा करीत होती. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना गोंधळ घालू नका आणि तेथून जा असे सांगितले. त्यावेळी आरोपींनी आरडाओरडा करुन ‘तुम्हांला जे काही करायचे आहे ते करा, आम्ही येथील भाई आहोत. आम्हांस कोण अडवणार, रस्ता तुमच्या बापाचा आहे का? तुम्हाला आता बघुन घेतो.’ असे म्हणत आरोपी त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यातील एका मुलाने त्याच्या कमरेला लावलेले लोखंडी हत्यार काढले. हे हत्यार हवेत फिरवत ‘करा रे वाढदिवस साजरा. कोण अडवतय बघू’ असे म्हणत दहशद माजविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
