विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे ध्येय असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सोयी सुविधांसाठी शासन कटिबद्ध आहे. येत्या काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक धोरण ठरविण्यात येणार असल्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

विभागीय शिक्षण मंडळ, नाशिक विभाग नाशिक येथे दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी दीपक केसरकर बोलत होते. यावेळी विभागीय मंडळ नाशिक विभाग नाशिकचे चेअरमन नितीन उपासनी, शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण पाटील, महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी बी. टी. पाटील व नाशिक विभागातील शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षण संस्थांचे संचालक व प्रतिनिधी उपस्थित होते.

शालेय शिक्षणमंत्रीदीपक केसरकर पुढे म्हणाले की, मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांना मोफत गणवेश, पुस्तके, वह्या व इतर सुविधा शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच शैक्षणिक संस्थांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी टप्पा अनुदान जाहीर करण्यात आले. परंतू या अनुदानातून फक्त 25 ते 30 टक्केच नवीन शाळांना मान्यता देण्यात आल्यामुळे यासाठी काही अटी, शर्ती शिथिल करुन जास्तीत जास्त शैक्षणिक संस्थाना न्याय देण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरु आहे. तसेच विशेष मोहिम राबवून जवळपास 61 हजार शिक्षकांना न्याय देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांचे पाठीवरचे ओझे कमी करणार
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण आनंदाने घेता यावे यासाठी शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने दफ्तराचे ओझे कमी करण्यावर भर देण्यात येणार असून एकाच पुस्तकातून सगळे विषय शिकविण्याबाबतचा प्रयोग महाराष्ट्रात राबवायचा असून यामध्ये शिक्षण विभागाने लक्ष घालावे, अशा सूचनाही श्री. केसरकर यांनी दिल्या.