देवेंद्र फडणवीसांच्या मास्टर स्ट्रोकमुळे तुम्हाला घरी बसावं लागलं; चंद्रशेखर बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्यावतीने संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या बैठकीमध्ये बोलतांना उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘काहीजण सांगतायत की, आता हे काँग्रेस फोडणार आहेत. मग आणखी एक उपमुख्यमंत्री करावा लागेल. फडणवीस मग मस्टर मंत्री राहणार का?’ असा सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला होता.

याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बावनकुळे यांनी ट्विट करत टीका केली आहे की, ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे. राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते हे तुम्ही विसरलात की काय? मा. नरेंद्र मोदीजींवर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे आणि देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं.असा हल्लाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी चढवला आहे.

औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे? हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला. तसाच सुरूंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला आहे. 2024 सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा. कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय, अशी टीका त्यांनी केली.