राज्यात आता अहंकाराचे थर कोसळले असून विकासाचे थर रचले जात आहेत. देशात राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येत असले. तरी त्याचा काहीही परिणाम होणार नसून २०२४ च्या लोकसभेची हंडी हे मोदीच फोडतील, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. काल (८ सप्टेंबर ) रोजी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दिघे साहेबांच्या दहीहंडीला मुख्यमंत्री शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलतांना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाले असून हा महाविकास आघाडीचा नाकर्तेपणा होता, अशी टिकाही त्यांनी केली. तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी केले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, टेंभी नाक्यातील सर्व गोविंदा सर्वात आधी आनंद दिघेंच्या दहीहिंडीला सलामी देतात. आजही त्यांच्यात दहीहंडीचा उत्साह कायम आहे. त्यामुळं सर्वात आधी या गोविंदांना शुभेच्छा. तरुणाईचा प्रचंड उत्साह इथं पहायला मिळतो आहे.ही आपली परंपरा आहे, ही संस्कृती आहे. हे सण, उत्सव वाढले पाहिजेत, ही भावना मनात ठेऊन आनंद दिघेंनी गोविंदा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असे अनेक सण सुरु केले. सनातन धर्मातही या गोविंदा उत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे.
याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ठाणे शहरात दहीहंडीचा सण मोठ्या प्रमाणात साजरे करायची सुरुवात धर्मवीर आनंद दिघे यांनी केली. त्यांच्याच प्रेरणेतून राज्य सरकारने यंदा प्रथमच प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करून दहीहंडीच्या खेळाला प्रतिष्ठा मिळवून दिली. गोविंदा या खेळाला शासकीय खेळाचा दर्जा दिला. राज्यातील १ लाख गोविंदाना १० लाख रुपयांचा विमा काढला, दहीहंडीच्या सणाला शासकीय सुट्टी जाहीर केली तसेच या खेळात जखमी झालेल्या गोविंदाना ५ लाख, गंभीर जखमींना साडे सात लाख आणि मृत्यू झाल्यास १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात द्वेषभावनेने काहीजण एकत्र आले आहेत. पण, ते कितीही एकत्र आले तरी २०२४ मध्ये लोकसभेची हंडी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच फोडतील, असेही ते म्हणाले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या मुलाने सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर भाष्य करत शिंदे यांनी स्टॅलिन आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी निष्ठेचे धडे देऊ नये, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
