यापुढे राज्यात शिक्षकांच्या नियमित बदल्या होणार नाहीत – मंत्री दीपक केसरकर

शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यात यापुढे जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत, असे दीपक केसरकर म्हणाले. शिक्षक एकदा शाळेवर नियुक्त झाला तर निवृत्तीपर्यंत एकाच शाळेवर राहण्याची मुभा यापुढे शिक्षकांना असणार आहे, असे ते म्हणाले.

येत्या 20 डिसेंबरपासून राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. तसेच निवडणूक आयोग आणि जनगणना व्यतिरिक्त इतर कोणतीही शासकीय कामं शिक्षकांना विभागाच्या परवानगीशिवाय देता येणार नाही, असं स्पष्टपणे केसरकरांनी सांगितलं आहे. जिल्हा परिषदच्या शाळा बंद करणे हे राज्य सरकारचे धोरण नाही. एक विद्यार्थी असेल तरीही शिक्षक मिळेल. जेथे प्रवासाचा प्रश्न असेल त्या विद्यार्थ्याला शाळेत पोहवणे ही शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी असणार असल्याचं केसरकरांनी म्हटलं.

तीन वर्षांनंतर शिक्षकाची बदली केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारणेत खंड पडतो ही बाब विचारात घेऊन राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळा तसेच शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शाळांतील शिक्षकांच्या नियमित बदल्या यापुढे केल्या जाणार नाहीत. मात्र जर एखाद्या शिक्षकाला बदली करायचीच झाल्यास त्यासाठी विशेब बाब अथवा पुरेसे कारण असेल तरच या निर्णयाला अपवाद केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरू
राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हानिहाय बिंदूनामावली अंतिम करण्यात आली आहे. आता विद्यार्थांना पसंती क्रमांक देण्यास सांगितले जाईल. दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.