मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनी केला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार यांनी केला असल्याचं मोठं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. शरद पवारांना मराठा समाजाला कधी आरक्षण द्यायचेचं नव्हते. स्वत:च्या नेतेपदासाठी शरद पवारांनी समाजांना झुंझवत ठेवल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मराठा आरक्षणासाठी मोठी आंदोलनं सुरु आहेत. इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना सुप्रिया सुळे मराठा आरक्षणाशिवाय इतर महत्त्वाचे प्रश्न नाहीत का असं सांगत निघून गेल्या होत्या. ज्यांना वारंवार संधी मिळाली त्यांच्या मनात असतं तर मंडळ आयोग लागू झाला तेव्हा आऱक्षण देता आलं असतं. कोण कोणत्या यादीत आहे हेदेखील पाहिलं नाही,” अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली.

मराठा समाजाला आरक्षण देणार परंतु, काहीही झालं तर ओबीसी समाजाच्या आरक्षणावर संकट येऊ देणार नाही, हे आम्ही कमेंटमेंट दिली आहे. तसेच कार्यकर्त्यांनी मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे. असं समजून सांगा. तसेच ओबीसी आणि मराठा समाजातील विभाजनचं लोण पसवू देऊ नका. निवडणुकांची आपण चिंता करत नाही. यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“विरोधक रोज आपल्या भूमिका बदलत आहेत. उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस ज्या प्रकारच्या भूमिका घेत आहेत, त्यांना केवळ सत्तेच्या राजकारणात आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. यामुळे येणारे दिवस अधिक सावधानतेने काढावे लागणार आहेत,” असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.