महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर महायुती मध्ये सहभागी होणार असेल तर आमची सर्वांची गोळाबेरीज होऊन चांगले परिणाम दिसून येतील. एनडीए मध्ये आणखी काही पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न अमित शहा यांच्याकडून सुरू आहे त्या संदर्भात ‘मनसे’शी देखील चर्चा सकारात्मक सुरू आहे त्याचा महायुतीला फायदाच होणार आहे, असे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
विजय शिवतारे हे वैयक्तिक टीका करत आहेत. त्यावर बोलताना कोणी कोणावर टीका करू शकतो. लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मी मध्यंतरी ऐकलं त्यांचं आणि एकनाथ शिंदे यांचं बोलणं झालेलं आहे. ते त्यांचा निर्णय घेतील बाकी मी जास्त काही बोलणार नाही असं देखील अजित पवार विजय शिवतारे यांच्या बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हणाले.
बारामती लोकसभा मतदारसंघात येणार्या धायरी भागात महायुतीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार,भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी महायुती सोबत असलेले घटक पक्षाचे नेते मंडळी देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधताना अजित पवार यांनी राज्यातील अनेक घडामोडी बाबत भूमिका देखील मांडली.त्यावेळी पार्थ पवार हे प्रचार यंत्रणेत सहभागी होताना दिसत नाही.त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की,ते गुप्त पद्धतीने प्रचार करतात.गनिमी काव्याने प्रचार चालू असल्याचे अजित पवारांनी मिश्कीलपणे सांगितले.
अजित पवार यांनी खडकवासल्यात घड्याळाला मतदान होत नाही असे नमूद करत घड्याळ चिन्हाविषयी चिंता व्यक्त करताना महायुतीच्या घटक पक्षांना त्यांनी सांगितले की घड्याळाला भाजप शिवसेनेचे मतदार मतदान करत नाहीत. मात्र मतदारांना सांगा बारामती शिरुर मध्ये आपले चिन्ह घड्याळ आहे.
