ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमीच वेगवेगळ्य कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या राजकीय विधानाची नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चा होते. सध्या लोकसभा निवडणुकीच्या काळात तर त्यांच्या टीकेला चांगलीच धार आली आहे. ते पत्रकार परिषदा, सभा, रॅलींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सत्ताधारी भाजप यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी आज (1 एप्रिल) पत्रकारांशी संवाद साधताना पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरशी केली आहे. राऊतांच्या या टीकेवर भाजपने आता आक्रमक पवित्रा धारण केला आहे. भाजपचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी राऊतांवर हल्लाबोल केलाय.
संजय राऊतांवर हल्लाबोल करताना प्रसाद लाड म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हीन भाषेत टीका करणारा संजय राऊत नावाचा नाच्या याला माहित नाही आहे की, या देशातील 130 कोटी जनतेचा स्वाभिमान जर कोण असेल, तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. सकाळी उठून लिपस्टिक पावडर लावून, टीव्हीवर येऊन काहीही घृण भाषेत बोलायचं, देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करायचा. अरे नटरंगी नाच्या या देशाची जनता तुझं चपलेने तोंड फोडल्याशिवाय, तुझी लायकी दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही. संज्या तुला मी सांगतो, तुला सोडणार नाही, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला आहे.
अशा प्रकारची हीन कृत्ये जर संजयजी तुम्ही परत केलीत, तर मी तुम्हाला जी म्हणणार नाही. संज्या तुला मी सांगतो, तुला मी सोडणार नाही”, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला.
