महाराज अजूनही वेळ गेलेली नाही अर्ज भरण्यापूर्वी फेरविचार करा असे विधान राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी छत्रपती शाहू महाराज यांना उद्देशून केले आहे. कोल्हापूरमधील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मविआचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी गुरुवारी वादग्रस्त वक्तव्ये केले होते. त्यानंतर आता हसन मुश्रीफ यांनी देखील शाहू महाराजांना निवडणूक न लढवण्याचा सूचक इशारा दिला आहे.
शाहू छत्रपती यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे परंतु ते लोकसभेचे उमेदवार म्हणून एका पक्षाचे झाले. त्यामुळे ते वादात ओढले जाणार हे उघड होते. म्हणूनच त्यांना मी पूर्वीपासून राजकारणात येऊ नये अशी विनंती केली होती. अजूनही वेळ गेलेला नाही त्यांनी उमेदवारीबाबत फेरविचार करावा, असा सल्ला हसन मुश्रीफ यांनी दिला.
कोल्हापूर येथे संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत हसन मुश्रीफ म्हणाले, “छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी जेव्हा ठरत होती, तेव्हाच मी त्यांना निवडणुकीत न उतरण्याचे आवाहन केले होते. कोल्हापूरच्या गादीचा एक वेगळा सन्मान आहे. पण राजकारणात उतरल्यानंतर तुम्ही विनाकारण वादात ओढले जाल, असे मी त्यांना सांगितलं होतं. क्रिकेटच्या मैदानात उतरल्यानंतर नियमाप्रमाणे खेळावेच लागतं. मी आजही म्हणेण, अर्ज भरायला अजून वेळ आहे. त्यामुळे तुमचा सन्मान राखायचा असेल तर तुम्ही फेरविचार करावा. कारण ज्या गादीचा आम्ही सन्मान केला, त्यावर टीका होणे आम्हाला योग्य वाटत नाही.”
ज्यावेळी खासदार संजय मंडलिक यांच्या बद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल करण्यात आले. त्यावरून महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून ही उलट उत्तर दिले जातील. तेव्हा वादाला सुरुवात होईल असं मला वारंवार वाटत होतं. जर काँग्रेसला खरोखरच छत्रपती यांच्या बद्दल आदर होता तर त्यांनी राज्यसभा द्यायला हवी होती.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरीचं धरण बांधलं, त्यातून उतराई होण्याची संधी मिळाली आहे, असा प्रचार विरोधक करत आहेत. राजर्षी शाहू महाराजांनी धरण बांधलं ते ठिक आहे. पण सदाशिवराव मंडलिक यांनी केलं, तेही कोल्हापूरकरांना माहीती असायला हवं. कोल्हापूरची जनता दूषित पाणी पित होती, त्यासाठी सदाशिवराव मंडलिक यांनी गैबी बोगद्यातून पाणी मिळवून दिले. त्यांच्यावर अनेकदा टीका झाली, पण त्यांनी स्वच्छ पाणी मिळवून दिले.
