संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज आणीबाणीच्या मुद्यावरून काँग्रेसवर टीका केली. ‘‘काँग्रेसचे नेते आमच्यावर हुकुमशाहीची टीका करतात पण आणीबाणीच्या काळात (1975) मलाच अठरा महिने तुरुंगामध्ये ठेवण्यात आले होते. याच काळामध्ये माझ्या आईचे मेंदूच्या पक्षाघातामुळे निधन झाले होते पण मला अंत्यसंस्काराला देखील जाता आले नाही. मला तेव्हा तत्कालीन सरकारने पॅरोल देखील मिळू दिला नव्हता, आज हीच मंडळी आम्ही हुकूमशहा असल्याची टीका करत आहेत,’’ असे राजनाथसिंह यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.
राजनाथ सिंह म्हणाले, आईच्या निधनानंतर अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी आपल्याला पॅरोल दिला नाही आणि आज काँग्रेस आम्हाला हुकुमशाह म्हणत आहे. माझी आई 27 दिवस रुग्णालयात उपचार घेत होती. तिला मी साधे भेटूही शकलो नाही, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही राजनाथ सिंह यांनी टिका केली. ते म्हणाले, काँग्रेस सत्तेत असताना किती हजार चौरस किलोमीटर जमीन चीनने बळकावली, यावर मी बोलू इच्छित नाही. पण मी देशातील नागरिकांना आश्वासित करतो की, कुणीही देशाची एक इंचही जागा आता काबीज करू शकत नाही.राजनाथ सिंह म्हणाले, पाकिस्तानकडून माझी अपेक्षा आहे की, दहशतवादाची मदत घेऊन भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. पाकिस्तानला दहशतवादावर नियंत्रण ठेवावे लागेल. पाकिस्तानला वाटत असेल की तो दहशतवादावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तर शेजारी देश भारताकडून सहकार्य मागू शकतो. दहशतवाद रोखण्यासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे.
पाकव्यप्त काश्मिरवर बोलताना ते म्हणाले. पिओके आपले होते, आपले आहे आणि आफलेच राहील. पाकीस्तानने दहशतवादाच्या आडुन भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परीणाम त्यांना भोगावे लागतिल. ते दहशतवाद्यांशी लढण्यास सक्षम नसतिल तर आम्ही त्यांना मदत करु.
दोनच दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांचे चीनने ‘नामांतर’ केल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. संरक्षणमंत्र्यांनी विचारले की जर भारतानेही असेच प्रयत्न केले तर याचा अर्थ चीनचे ते भाग “आमच्या भूभागाचा भाग” झाले आहेत का? अरुणाचल प्रदेशातील नामसाई भागात मंगळवारी एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, ईशान्येकडील राज्यातील 30 ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या हालचालीमुळे वास्तविकता बदलणार नाही.
