अरविंद केजरीवाल यांचा तिहारमधील मुक्काम वाढला; ७ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी

दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता आणि चनप्रीत सिंग यांना मोठा झटका दिलाय. न्यायालयाने या तिघांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मेपर्यंत वाढ केलीय. दिल्ली दारू धोरण प्रकरणी तिघांच्याही कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. अशाप्रकारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात राहणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासह बीआरएस नेत्या के. कविता आणि आम आदमी पार्टीचे गोवा निवडणुकीचे कथित निधी व्यवस्थापक चनप्रीत सिंग यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ केली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्चला दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीत अटक करण्यात आली होती. संबंधित धोरणही रद्द करण्यात आले. या धोरणाशी संबंधित प्रकरणात तिन्ही लोकांना दुरदृष्यप्रणालीद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या उपस्थितीत अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या डॉक्टरांशी दररोज १५ मिनिटे वैद्यकीय सल्लामसलत करण्याची विनंती न्यायालयाने फेटाळल्याच्या एक दिवसानंतरच न्यायालयाने कोठडी वाढवण्याचा निर्णय दिला.

अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्याच्या समस्यांवरून आणि इन्सुलिनवरून सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. इन्सुलिनसाठी केजरीवाल यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला होता. अनेकवेळा मागणी केल्यानंतर अखेर सोमवारी (२२ एप्रिल) केजरीवाल यांना तुरुंगात इन्सुलिन देण्यात आलं. केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वेगाने वाढत होतं. साखरेचं प्रमाण ३२० वर पोहोचलं होतं. त्यामुळे त्यांना इन्सुलिन देण्यात आलं.