उद्धव ठाकरे फक्त तोंडातून वाफ काढतात, त्यांचं भाषण मी जसंच्या तसं म्हणून दाखवेन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत भाजपनेच युती तोडल्याचे म्हणत भाजपचे वरिष्ठ नेते आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी गोप्यस्फोट केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी कठोर शब्दात टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरेंना तोंडाच्या वाफा काढण्याशिवाय यांना दुसरं काहीही जमत नसल्याची बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

उद्धव ठाकरे यांचे भाषण बघितले तर लक्षात येतं, त्यांची सगळी भाषणं ठरलेली आहेत. उद्धव ठाकरेंचं भाषण जसेच्या तसे मी म्हणून दाखवू शकतो, असा टोलाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलतांना लगावला आहे. आज देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह बघायला मिळत आहे. अशातच नागपुरातील गवळीपुरा, टेकडी परिसरातील हनुमान मंदिरात जाऊन आज देवेंद्र फडणवीसांनी मारोतीरायांचे दर्शन घेतले, यावेळी ते बोलत होते.

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुतिन यांची उपमा दिलीय. त्यावर “हे सर्वच्या सर्व निराश लोक आहेत. पराभवाच्या हताशेने शिवीगाळीवर उतरलेत. तुम्हाला माहितीय, मोदींना जेव्हा जेव्हा शिव्या पडतात, तेव्हा-तेव्हा विजय मोठा असतो. हे जेवढ्या शिव्या देणार, तेवढं लोकं मोदींवर प्रेम करणार” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेकडी रोडवरील हनुमान मंदिरात बजरंगबली जयंतीनिमित्त दर्शन घेतलं. यानंतर ते म्हणाले, ‘बजरंगबली बुद्धी आणि शक्ती देतात. त्यांना बुद्धी मागितली आहे. देशावर जे काही संकट येतात ते दूर करण्यासाठी आणि आमच्यासाठी बुद्धी आणि आमच्या विरोधकांसाठी सुबुद्धी मागितलेली आहे’.