सुप्रसिद्ध भेंडवळच्या घटमांडणीचं भाकीत आज सकाळी जाहीर करण्यात आलं आहे. शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा घट, घटात पाणी आणि त्यावर कुरडया, त्याच्या बाजूला पान सुपारी आणि पाणी पाऊस, पीक परिस्थिती, राजकीय स्थिती तसेच आर्थिक संकटे याबाबत ठोकताळे हे घटमांडणीचं पारंपरिक चित्र आहे. त्यामुळे सामान्य जनतेतही आणि राजकीय लोकांनाही या मांडणीची प्रचंड उत्सुकता असते. आज जाहीर करण्यात आलेल्या भाकितातून पिकं चांगली असणार आहेत. मात्र अतिवृष्टी होणार असल्यानं पिकाला अतिवृष्टीचा फटका बसणार असल्याचं वर्तवण्यात आलं आहे. ‘पानविळा कायम असल्यानं राजा कायम राहील,’ असा ‘सूचक’ अंदाज वर्तवण्यात आला. मात्र निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यानं कोणतंही थेट राजकीय भाकीत यावेळी जाहीर करण्यात आलं नाही.
भेंडवळच्या घट मांडणीतून पाऊस, पीक पाण्यासह राजकीय, आर्थिक भाकीत सुद्धा वर्तवली जातात. घट मांडणीच्या निरीक्षणावरुन ही भाकीतं केली जातात. यंदा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी करण्यात आली. पुंजाजी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेंडवळच्या घट मांडणीच निरीक्षण केलं. घट मांडणीच्या अंदाजानुसार, पहिल्या महिन्यात कमी पाऊस असेल. दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण म्हणजे पहिल्या महिन्यापेक्षा जास्त पाऊस असेल. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस पडेल असा भेंडवळच भाकीत आहे. अवकाळी पाऊस सुद्धा यंदा भरपूर असेल असा भेंडवळचा अंदाज आहे.
यंदा पावसाळा चांगला राहणार अशी आशा या भाकणुकीत वर्तवली गेली आहे. यंदा मान्सूनच्या पहिल्या महिन्यात अर्थातच जून महिन्यात कमी पाऊस बरसणार, दुसऱ्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार, तिसऱ्या महिन्यात अर्थातच ऑगस्ट महिन्यात पावसाची तीव्रता वाढणार आणि भरपूर पाऊस होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.विशेष म्हणजे मान्सूनच्या चौथ्या महिन्यात अर्थातच सप्टेंबर महिन्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होणार अशी शक्यता असल्याचे या घटमांडणीत स्पष्ट करण्यात आले आहे. यंदा कपाशी पिक सर्वसाधारण राहणार असं भाकित येथे सांगण्यात आलं आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची परंपरा सुमारे साडे तीनशे वर्षांपासून सुरू आहे. भेंडवळची घटमांडणी 10 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी केली जाते. मांडणीचं भाकीत 11 मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज जाहीर करतात. घटमांडणी नेहमी प्रमाणं शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाते. शेतकरी मोठ्या उत्साहानं या घटमांडणीचं भाकीत ऐकण्यासाठी उपस्थित असतात. घटांमध्ये झालेल्या बदलानुसार भाकितं वर्तवण्यात येतात.
