पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे नव्हे, तर शंभर देशाचे नेते आहेत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शरद पवार यांनी काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा एनडीएत यावं असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदूरबारच्या सभेत बोलताना केले होते. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी असा कोणताही प्रस्ताव दिला नसून त्यांचे विधान म्हणजे शरद पवारांच्या पक्ष विलनीकरणाच्या विधानावर दिलेली प्रतिक्रिया होती, असे ते म्हणाले. एएनआय वृत्तसंस्थेही बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

“निवडणुकीनंतर छोट्या प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल, असे शरद पवार स्वत: म्हणाले होते. कारण या निवडणुकीत काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांचा पराभव होणार, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. म्हणून त्यांही हे विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर पंतप्रधान मोदी यांनी आज प्रतिक्रिया दिली. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे विधान म्हणजे काही दोन्ही पक्षांना एनडीएत येण्याचं निमंत्रण होतं, असं नाही. माध्यमांशी त्याचा चुकीचा अर्थ लावला”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढे बोलताना, माध्यमांनीही कोणत्याही विधानाचा अर्थ लावताना पूर्ण विधानाच्या आधारे त्याचा अर्थ लावला पाहिजे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही कोविडच्या काळात मोदीजींमुळे जिवंत आहोत. जगातले अर्थशास्त्रज्ज्ञ मोदींनी भारतात ही क्रांती कशी घडवली? अशी विचारणा करत असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, बैलगाडा धावतो तसा विकासाचा वेग आपल्याला गाठायचा आहे. मोदीजी जगातील शंभर देशाचे नेते आहेत.

अमोल कोल्हेंनी मालिकांमधून पाच वर्षांसाठी निवृत्ती घेणार असल्याच्या घोषणेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमोल कोल्हेंचा सिनेमा फ्लॉप झाला आहे. त्यामुळं त्यांचं तिकीट आता घेऊ नका. निवडणूक आली की मालिकांमधून निवृत्ती घेतो अशी घोषणा करायची अन नंतर फक्त नाटकं करतात. आता परत तशीच घोषणा केलेली आहे. मला खात्री आहे, शिरूरची जनता नाटकं करणाऱ्यांना योग्य जागा दाखवते हे मला ठाऊक आहे.