राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. भुजबळांच्या नाराजीबाबत प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं होत, भुजबळ नाराज असल्याचं ऐकत आहे, पण त्यांच्याशी आमचा कोणताही संपर्क झाला नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं. दरम्यान त्यानंतर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळ यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं. भेटीनंतर भुजबळ आणि महाजन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये महाजन यांनी भेटीचं कारण सांगितलं आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, आता कुठली नाराजी आहे. मोदींच्या सभेत भुजबळांनी जोरदार भाषण केलं. त्यांच्या भाषणाचे सर्वांनी कौतुक केले. मोदीजींनी कशासाठी पंतप्रधान करायचे आहे. हे त्यांनी सांगितले. त्यामुळेछगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान पुढे बोलताना महाजन म्हणाले की, मतदार संघातील अनेकांना फोन करून नियोजन केले. त्यामुळे बैठक जास्त वेळ बैठक सुरू होती. भुजबळ आज गडकरींच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. शेवटचा टप्पा असल्यानं आज मुंबईत सभा आहे. त्यासाठी राज ठाकरे हे देखील उपस्थित असतील. दावे प्रतिदावे सुरू असले तरी ४ जून नंतर सगळ स्पष्ट होईल असं महाजन यांनी म्हटलं आहे.
सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते गेले दोन दिवस नाशिकमध्ये आहेत. ते सर्व आमदारांना भेटत असून निवडणुकीसंदर्भात बैठका घेत आहेत. त्यामुळे मध्यस्थीच विषय आला कुठून? अनिल देशमुखांना म्हणावं, त्यांनी आधी शरद पवार यांच्याबरोबर राहावं. तटकरेंची चिंता त्यांनी करू नये, असंही गिरीश महाजन म्हणाले.
छगन भुजबळांचा अनिल देशमुखांना टोला
“माझी या विषयावर सुनील तटकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी सांगितले की, असा कोणताही विषय नाही. माझं कोणाशीही बोलणं झालेलं नाही. या विषयावर ते लवकरच माध्यमांशी संवाद साधतील”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. तसेच अनिल देशमुख यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीकडून असं विधान येणं योग्य आहे का? असं विचारलं असता, “ते किती जबाबदार आहेत”, हे सर्वांना माहिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
