पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी युद्धापेक्षाही हे पर्याय ठरू शकतात परिणामकारक…

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारतातील जनतेचा रोष आता केवळ भावनांपुरता मर्यादित राहिलेला नाही. संतप्त जनता कृतीची मागणी करत आहे. भारत सरकारनेही आता केवळ राजनैतिक निवेदने न करता, ठोस आणि प्रभावी उपाययोजना हाती घ्यायला हव्यात, असे मत व्यक्त केले जात आहे. पाण्यातला धडा शिकविण्यासाठी प्रत्यक्ष युद्धापेक्षाही ठोस आणि परिणामकारक काय पर्याय असू शकतात याची चर्चा आता लष्करी तज्ज्ञांमध्ये आहे.

( These options can be more effective than war to teach Pakistan a lesson)

१. लक्ष्यभेदी कारवाया (Targeted Strikes)
भारतीय गुप्तचर संस्था सातत्याने सीमा रेषेवरील ( LOC)वरील दहशतवादी शिबिरांची माहिती घेत असतात. आता या शिबिरांवर तात्काळ हल्ला करणे गरजेचे झाले आहे. यामुळे घुसखोरी रोखली जाईल आणि पाकिस्तानवर दबाव वाढेल.

२. लक्ष्यित हत्या (Targeted Elimination)
इस्रायलने ज्या पद्धतीने हमासच्या नेत्यांना लक्ष्य केले तसेच पाकिस्तानातील ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘जैश-ए-मोहम्मद’च्या प्रमुख नेत्यांना लक्ष्य करून संपवावे. आधुनिक ड्रोन व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामुळे हे शक्य आहे आणि यासाठी एजंट पाठविण्याची गरज नाही.

३. युद्धविरामाचा (Ceasefire) फेरविचार
२०२१ चा युद्धविराम करार भारतासाठी आता तोटा ठरू लागला आहे. जर भारताने हा करार संपुष्टात आणला तर पाकिस्तानला नियंत्रण रेषेवर (LOC) मोठ्या प्रमाणावर सैन्य पाठवावे लागेल, ज्यामुळे त्याच्या इतर मोर्चांवरील दडपण वाढेल.

४. सागरी नाकेबंदी (Naval Blockade)
पाकिस्तानचा बहुतांश व्यापार कराची बंदरातून होतो. जर भारताने नौदलाद्वारे अरबी समुद्रात सागरी नाकेबंदी केली तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था गुदमरू शकेल. ही नाकेबंदी युद्धसदृश कृती मानली जाईल, पण भारताच्या हातात मोठा सामरिक लाभ येऊ शकतो.

५. शस्त्रास्त्रांचा वापर (Use of Missile Arsenal)
भारताकडे ‘पृथ्वी’, ‘अग्नी’ यांसारखी क्षेपणास्त्रे आणि अलीकडेच विकसित हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आहेत, जी कोणत्याही संरक्षण प्रणालीला भेदू शकतात. यांचा उपयोग करून पाकिस्तानातील ठराविक लष्करी व दहशतवादी ठिकाणांवर अचूक मारा केला जाऊ शकतो.

६. ‘प्रथम वापर नाही’ धोरणाचा पुनर्विचार (Review of No First Use Nuclear Doctrine)
आज भारताचे आण्विक धोरण ‘प्रथम वापर नाही’ (No First Use) आहे. पण पाकिस्तानाच्या अण्वस्त्र धमक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी या धोरणावरही पुनर्विचार करायला हवा. धोरणातील बदल केल्यास पाकिस्तानमध्ये भीतीचा वातावरण निर्माण होईल.

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आता आठवडा उलटत आला आहे. २६ निष्पाप हिंदू पर्यटकांची हत्या हा फक्त एक हल्ला नव्हता; तो भारताच्या आत्म्यावर घाला होता. त्यामुळे देशभर रोष उफाळला आहे आणि सरकारवर कठोर कृती करण्याचा दबाव वाढला आहे. सध्या दोन्ही बाजूंनी सीमारेषेवर तणाव वाढला असून, युद्ध नको तरीही ‘शत्रूला धडा शिकवणे’ अपरिहार्य बनले आहे. सरकारनेही त्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, माध्यमांना थेट युद्धकालीन वार्तांकनाच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे संकेत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबिया दौरा अर्धवट सोडून भारतात परत येत दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठिराख्यांना “कल्पनेपलीकडची शिक्षा” देण्याची ग्वाही दिली आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची यादी तयार करून त्यांच्या घरांची उद्ध्वस्ती सुरू झाली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) काही ठोस सुगावे मिळाले आहेत. हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी फोटोग्राफरने झाडावर चढून संपूर्ण दहशतवादी हल्ल्याचे व्हिडीओ टिपले. त्यातून सुरुवातीला दोन दहशतवादी दुकानांच्या मागे लपून बसल्याचे आणि लोकांना ‘कलमा’ पठण करायला लावल्याचे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यामागे स्थानिकांचा नव्हे, तर पाकिस्तानचा हात असल्याचे ठोस संकेत मिळाले आहेत.

पाकिस्तानातील दहशतवाद्यांना हमासकडून प्रशिक्षण मिळाले असल्याचा धक्कादायक तपशीलही समोर आला आहे. त्यामुळे या घटनेला बालाकोटसारख्या सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही अधिक तीव्र आणि व्यापक प्रत्युत्तर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.