पाकिस्तानचे खोट्या विजयाचे ढोल, पराभव झाकण्यासाठी जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल !

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लष्करी पातळीवर जबरदस्त फटका बसला असतानाही प्रपोगंडा वॉरमध्ये पारंगत असलेल्या पाकिस्तानने खोट्या विजयाचे ढोल वाजवायला सुरुवात केली आहे.
दारुण पराभवावर पांघरूण घालण्यासाठी आणि जनतेच्या मनात अभिमान निर्माण करण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना ‘फील्ड मार्शल’ पदावर पदोन्नती दिली आहे. ( Pakistans drumbeat of false victory General Asim Munir made Field Marshal to cover up defeat!)

१९५९ नंतर हे पद दिलं गेलेलं हे केवळ दुसरं उदाहरण असून, यामागे खऱ्या शौर्यापेक्षा राजकीय प्रदर्शन अधिक दिसून येत आहे. भारतीय लष्कराने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले करून मोठा धक्का दिला. या जबरदस्त प्रत्युत्तरानंतर चार दिवस सुरू राहिलेल्या संघर्षात पाकिस्तानने मोठे नुकसान सोसले. भारताच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना तोंड देता न आल्यामुळे पाकिस्तानची लष्करी यंत्रणा गडबडली, आणि शेवटी पाकिस्तानच्या डीजीएमओने स्वतः भारताशी संपर्क साधून कारवाया थांबवण्याची विनंती केली. त्यामुळे पाकिस्तान भारताच्या हल्ल्यामुळे धास्तावला होता हे स्पष्ट होते.

पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जाहीर करण्यात आले की, ‘ऑपरेशन बुनयान-उम-मरसूस’च्या नावाखाली पाकिस्तानने भारताला परतवून लावल्याचा दावा केला जात आहे, पण सत्य हे की भारताने केवळ दहशतवादी तळच उद्ध्वस्त केले नाहीत, तर पाकिस्तानला लष्करी पातळीवरही झुकवले.

जनरल असीम मुनीर यांचं नेतृत्व हे युद्धकौशल्यापेक्षा पराभव लपवण्याचे माध्यम ठरले. मात्र पाकिस्तान सरकार त्यांना विजयाचा नायक ठरवून त्यांच्या पदोन्नतीचे गोडवे गात आहे. हे स्पष्टच आहे की, ही पदोन्नती वास्तवातल्या पराभवावर खोटं यश झाकण्याचा प्रयत्न आहे.

राष्ट्रपती झरदारी यांनी देखील या पदोन्नतीस पाठिंबा दिला, पण भारताने ज्या पद्धतीने दहशतवाद्यांच्या आश्रयस्थळांवर तडाखेबंद कारवाई केली, त्यातून संपूर्ण जगाला भारताची क्षमताच नव्हे तर पाकिस्तानची हतबलताही दिसून आली. त्यामुळे पाकिस्तानने आता फील्ड मार्शलचा तमाशा मांडून देशातील जनतेचे लक्ष खऱ्या पराभवापासून वळवण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला आहे.