काँग्रेसचे क्षुद्र राजकारण आणि पाकिस्तानी प्रचाराचे हत्यार ठरलेले राहुल गांधी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पाकिस्तानला जागतिक स्तरावर मोठा धक्का बसला आहे. भारताने केवळ दहशतवाद्यांवर प्रहार केला नाही, तर पाकिस्तानला धडा शिकवला. मात्र, या ऐतिहासिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुन्हा एकदा देशहितापेक्षा राजकीय चिखलफेक महत्वाची मानली. राहुल गांधींची विधाने थेट पाकिस्तानच्या प्रचारयंत्रणेसाठी हत्यार ठरत आहेत. ( Congress petty politics and Rahul Gandhi a tool of Pakistani propaganda)

भारतीय जवानांनी सीमेवर पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले, तेव्हा देशांतर्गत एकीची अपेक्षा असताना काँग्रेसने क्षुद्र राजकारण करत पाकिस्तानच्या प्रचाराला हातभार लावला. राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाच्या वक्तव्यांनी केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधींनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा बनावट व्हिडीओ शेअर करून दावा केला की ऑपरेशन सिंदूरपूर्वी पाकिस्तानला माहिती देण्यात आली होती. तसेच त्यांनी भारतीय हवाई दलाने किती विमाने गमावली यावर प्रश्न उपस्थित केला. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने स्पष्टपणे सांगितले आहे की संबंधित व्हिडीओ बनावट आहे आणि ऑपरेशन संपल्यानंतरच पाकिस्तानला सूचना पाठवण्यात आली होती. केवळ दहशतवादी तळांवर कारवाई केली जात आहे, लष्करावर नाही, हे स्पष्ट करण्यासाठी राजकीय मुत्सद्देगिरी म्हणून हा इशारा दिला होता.

पवन खेऱा यांनी तर पत्रकार परिषदेत थेट आरोप केला की, या सूचनेमुळे दहशतवादी पळून गेले असावेत. त्यांनी सरकारवर “मुखबिरी”, विश्वासघात आणि अजहर मसूद-हाफिज सईद यांना ‘बचावले’ असा गंभीर आरोप केला. हे फक्त राजकीय टीकेपुरते मर्यादित नव्हते, तर थेट राष्ट्रविरोधी षड्यंत्राचा आरोप करत सरकारच्या निर्णयक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या विधानांचा पाकिस्तानी मीडियाने उघड फायदा घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताचे अपयश असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला. राहुल गांधींची विधाने भारतात कितीही राजकीय वाटली तरी सीमेपलीकडच्या प्रचारासाठी ते हत्यार ठरले.

दरम्यान, पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी भारत सरकारने सात शिष्टमंडळे परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला. यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व शशी थरूर करत असून काँग्रेसने आनंद शर्मा, गौरव गोगोई, नासिर हुसेन आणि अमरिंदर सिंग ब्रार ही नावे सुचवली होती. सरकारने यातील फक्त आनंद शर्मा यांचे नाव स्वीकारले आणि उर्वरित ठिकाणी थरूर, मनीष तिवारी आणि सलमान खुर्शीद यांची नियुक्ती केली. यावर काँग्रेसने ” राजकारण” केल्याचा आरोप केला.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ऑपरेशन सिंदूरवर राजकारण होत असल्याचा दावा करत पंतप्रधान मोदी आणि जयशंकर यांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला.