नवल किशोर राम पुन्हा पुण्यात, महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्याचे माजी जिल्हाधिकारी वरिष्ठ आयएएस अधिकारी नवल किशोर राम यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. येत्या ३१ मे रोजी विद्यमान आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे सेवानिवृत्त होतील. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर राम हे आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतील. यापूर्वी ते पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून कार्यरत होते.
( Naval Kishore Ram back in Pune appointed as new Municipal Commissioner)

नवल किशोर राम यांनी ३१ मे रोजी दुपारी डॉ. भोसले यांच्याकडून पदभार स्वीकारावा, असे निर्देश आदेशात देण्यात आले आहेत.

नवल किशोर राम हे २००८ च्या महाराष्ट्र कॅडरमधील आयएएस अधिकारी आहेत. ते मूळचे बिहारमधील चंपारण येथील आहे. आयएएस बनल्यानंतर त्यांचे पहिले पोस्टिंग नांदेड मध्ये झाले होते. त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पहिले. त्यांनतर बीड आणि संभाजीनगर जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. संभाजीनगर मधील कचऱ्याच्या प्रश्नाच्या निमित्ताने ते प्रकाशझोतात आले होते. एप्रिल २०१८ मध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. कोरोना काळात ते पुण्याचे जिल्हाधिकारी होते. पुण्यातील त्यांच्या कार्यकाळात नागरी प्रशासन आणि शहरी व्यवस्थापन क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात आले. राम यांना केंद्रीय स्तरावर पंतप्रधान कार्यालयातही उपसचिव म्हणून कामाचा अनुभव आहे. २०२० मध्ये नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

येत्या ३१ मे रोजी विद्यमान आयुक्त डॉ. भोसले सेवा निवृत्त होत आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेचे आयुक्त पद रिक्त होत आहे. त्यामुळे नवल किशोर राम यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडुन ३१ मे रोजी नवल किशोर राम यांनी पदभार स्विकारावा असे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले आहेत.

कोविड-१९ साथीत योगदान
कोरोना काळात ते पुण्याचे जिल्हाधिकारी होते. पुण्यात कोविड-१९ महामारीच्या काळात नवल किशोर राम यांनी जिल्हाधिकारी म्हणून प्रभावी उपाययोजना राबवल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ६४% होते.