विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने अमित साटम यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा साेपवली आहे. साटम हे आक्रमक नेते असून मुंबईच्या नागरी प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. मुंबईतील भाजप मुख्यालयात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. ( Amit Satam appointed as Mumbai BJP President announced by Chief Minister Devendra Fadnavis)
गेल्या सहा वर्षांपासून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असलेले आशिष शेलार यांच्याकडे सांस्कृतित कार्य आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रीपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे पूर्ण वेळ अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे.
अमित साटम यांनी गेली अनेक वर्षे मुंबईच्या पश्चिम उपनगरात नगरसेवक आणि आमदार म्हणून काम केले आहे. अमित साटम हे तीनवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभा आणि विविध व्यासपीठांवर भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्याचे काम केले आहे.
अमित साटम यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आशिष शेलार यांनी मुंबई विभागाचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळले. 2017 च्या निवडणुका असतील, आत्ताच्या निवडणुका त्यांनी उत्तम काम केलं. मंगलप्रभात लोढा यांनी उत्तम रितीने कार्यभार सांभाळला. पुन्हा आशिष शेलार यांच्याकडे धुरा आली, विधानसभेत चांगले यश मिळाले. मुंबईतील नंबर एकचा पक्ष म्हणून सिद्ध केलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अभ्यासू आणि आक्रमक अशी अमित साटम यांची प्रतिमा आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मुंबईच्या राजकारणाची जाण आणि कल्पकता त्यांच्याकडे आहे. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप मुंबईत घोडदौड राखेल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. पुन्हा महायुतीची मुंबईत सत्ता येईल हा विश्वास आहे. सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्या ते चांगल्या पद्धतीनं पार पडतील. सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीमागं आहेत. अमित साटम यांना शुभेच्छा देतो, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
अमित साटम ऑक्टोबर 2014 पासून ते सलग तिसऱ्या कार्यकाळात अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधानसभेचे आमदार आहेत. 15 ऑगस्ट 1976 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे जन्मलेल्या साटम यांनी 1998 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्समधून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात बॅचलर ऑफ आर्ट्स पूर्ण केले. पुढे त्यांनी महात्मा गांधी मिशन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (कार्मिक) ची पदवी घेतली.
