निर्दयपणे लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चार आरोपी अटक, ७.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

विशेष प्रतिनिधी

पुणे : मोटरसायकल चोरीच्या प्रकरणातून सुरू झालेल्या तपासातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी निर्दयपणे लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. महाळूंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने या कारवाईत चार आरोपींना अटक करून ७ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
( Ruthless looting gang busted four accused arrestedvaluables worth Rs 7.41 lakh seized)

अटक आरोपींमध्ये प्रसाद भारत पांडव (२५, वेरुळ, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर), आशीष राजाराम भोसले (१९, बोल्हेगाव, सावेदी, अहमदनगर), ऋषिकेश नवनाथ धाक्तोडे (२३, गेवराई, नेवासा, अहमदनगर) आणि शिवम ऊर्फ पवन रमेश भालेराव (२१, खडकी, कोपरगाव, अहमदनगर) यांचा समावेश आहे.

परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता प्रशांत चोपडे यांनी सावरदारी गावातील ऑस्टोपाईन कंपनीच्या गेटसमोर मोटरसायकल उभी केली असता अज्ञात चोरट्याने ती चोरली. याप्रकरणी महाळूंगे ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. कसून चौकशीत त्याच्यासोबत आणखी दोन साथीदार असल्याचे उघड झाले. त्यानंतर खेड-राजगुरूनगर परिसरातून तिघांनाही अटक करण्यात आली.

चौकशीत असे उघड झाले की आरोपींनी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून घरातील सदस्यांना मारहाण केली होती. चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांचे हातपाय व तोंड बांधून सोने व रोकड लुटली होती.

आरोपींकडून चोरीची मोटरसायकल, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, लोखंडी पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे असा एकूण साडेसात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *