विशेष प्रतिनिधी
पुणे: पुणे येथील विशेष न्यायालयाने आर्यन प्रविण चौरसिया यास एनडीपीएस कायद्यातील प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एम. जी. चव्हाण यांनी हा आदेश दिला. ( Drug accused granted bail due to delay in sending samples)
आरोपी तर्फे अँड नीलेश वाघमोडे यांचे मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. चौरसिया याला पोलिसांनी 12 मे 2023 रोजी 106 ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) बेकायदेशीरपणे बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यावेळी जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत 21 लाख 20 हजार रुपये इतकी असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता
सरकार पक्षाने या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला होता. सरकारी वकिलांचा दावा होता की हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून आरोपी पुन्हा तत्सम गुन्हा करू शकतो. मात्र बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की आरोपी 2 वर्षे 4 महिने तुरुंगात आहे, तपास पूर्ण झाला असून चार्जशीटही दाखल झाली आहे. तसेच एनडीपीएस कायद्यातील कलम 52-अ नुसार नमुने प्रमाणित करण्याची प्रक्रिया वेळेत न झाल्याचे निदर्शनास आणले.
न्यायालयाने आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून “बेल हा नियम असून जेल ही अपवादात्मक बाब आहे” या तत्त्वाचा आधार घेत आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला.
आरोपी तर्फे अँड नीलेश वाघमोडे अँड महेश देशमुख यांना अँड श्रीकांत मोटे यांनी सहकार्य केले.
