पाळीव श्वानांचा लहान मुलांवर हल्ला, उत्तमनगर आणि येरवडा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल

विशेष प्रतिनिधी

पुणे : पाळीव श्वानांनी हल्ला केल्यामुळे दोन लहान मुले जखमी झाल्याच्या दोन घटना अनुक्रमे उत्तमनगर येथील कोंढवे-धावडे आणि येरवडा येथे घडल्या. याप्रकरणी उत्तमनगर आणि येरवडा पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ( Pet dogs attack childrentwo cases registered at Uttamnagar and Yerawada police stations)

पहिली घटना कोंढवे धावडे येथील न्यू अर्बन ग्राम सोसायटीमध्ये घडली असून एका बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर पाळीव श्वानाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी श्वानमालक असलेल्या आयटी इंजिनियर महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुझॅन विक्रमकुमार जोसेफ (रा. न्यू अर्बन ग्राम सोसायटी, कोंढवे धावडे) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर भारतीय न्याय संहिता २९१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिल्पा उमेश झापे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. आर्यन उमेश झापे (वय १२) असे जखमी मुलाचे नाव आहे.

आरोपी सुझॅन ही आयटी कंपनीमध्ये नोकरी करते. तिने भारतीय जातीचे एक श्वान पाळलेले आहे. हे श्वान फिरायला नेत असताना तिने कोणतीही खबरदारी घेतलेली नव्हती. या श्वानामुळे मानवी जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव असताना देखील सोसायटीच्या पार्किंगमध्ये त्याला मोकळे सोडण्यात आले. या ठिकाणी फिर्यादी झापे यांचा मुलगा आर्यन हा खेळत होता. या त्याच्या पायाच्या पोटरीला चावा घेऊन त्याला गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

तर, दुसऱ्या घटनेत सहा वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. या मुलावर श्वानाने हल्ला करून त्याच्या पोटाचा चावा घेऊन त्याला गंभीर जखमी केले. ही घटना येरवडा येथे घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २९१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेरोलिका लॉरेल फ्रान्सिस (वय ३५, रा. लक्ष्मी नगर, येरवडा) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी राजन भीमराव गायकवाड (वय ४२, रा. लक्ष्मी नगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सम्राट (वय ६) हा त्याच्या घराजवळ असलेल्या भीम ज्योत मित्रमंडळाजवळ खेळत होता. त्यावेळी आरोपी यांनी पाळलेल्या श्वानाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या पोटाला चावा घेत त्याला गंभीर जखमी केले. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *