विशेष प्रतिनिधी
पुणे : गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी शस्त्र परवाना दिल्याचे समोर आले. त्यानंतर राजकीय वर्तुळात वादंग उठले. विरोधी पक्षांकडून कदम यांच्यावर टिका करण्यात येऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
(Minister of State for Home Affairs Yogesh Kadam granted arms license to Sachin Ghaiwal brother of gangster Nilesh Ghaiwal Kadam said that till then there were no pending cases against him…)
दरम्यान याबाबत कदम यांनी ट्विट केले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून, नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणूनच, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे.
