खडकवासला धरणाजवळील ६५ वर्षे जुना पूल ‘धोकादायक’; जड वाहनांसाठी बंद

विशेष प्रतिनिधी

पुणे : खडकवासला धरणाजवळील मुठा नदीवरील ६५ वर्षे जुना पूल धोकादायक ठरल्यामुळे महापालिकेने जड व उंच वाहनांची वाहतूक बंद केली आहे. मात्र, मोटार आणि दुचाकी या हलक्या वाहनांसाठी पूल खुला ठेवण्यात आला आहे.
( 65-year-old bridge near Khadakwasla dam dangerous closed for heavy vehicles)

खडकवासला येथून एनडीए, कोंढवे-कोपरे आणि कुडजे या भागांकडे जाणारा रस्ता या पुलाद्वारे जोडला जातो. मात्र, मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी पुलाच्या तडे गेलेल्या आणि गंजलेल्या लोखंडी गार्डरच्या छायाचित्रांचा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

यानंतर खडकवासला पाटबंधारे विभाग, उत्तमनगर पोलिस ठाणे आणि वाहतूक शाखेने महापालिकेला तातडीची माहिती दिली. महापालिकेच्या अभियंत्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट व तांत्रिक तपासणी करण्यात आली.

या तपासणीत पूल ‘अतिधोकादायक’ असल्याचे स्पष्ट निष्कर्ष आढळले. त्यामुळे जड वाहनांची वाहतूक बंद करून फक्त हलकी वाहने, मोटार आणि दुचाकी यांच्यासाठी तात्पुरता वापर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

“हा पूल १९६० मध्ये बांधला गेला असून कालांतराने त्याचा दर्जा खालावला आहे. सध्या तो फक्त हलक्या वाहनांसाठीच सुरक्षित आहे,” असे महापालिकेचे प्रकल्प विभागाचे उपअभियंता संतोष लांजेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *