पुण्यात काँग्रेसला आणखी मोठा धक्का; दोन प्रमुख पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार

विशेष प्रतिनिधी

पुणे :आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शहरातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग दिला असून, काँग्रेसला आज आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील दोन प्रमुख पदाधिकारी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. ( Another big blow to Congress in Pune Two key office bearers to join BJP today)

यामध्ये काँग्रेसचे एक माजी राज्यमंत्री असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात असून, या प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. दुसरे पदाधिकारी हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील असून, त्यांनी यापूर्वी भाजपविरोधात निवडणूकही लढविली होती. त्यांच्या प्रवेशाला स्थानिक पातळीवर विरोध असतानाही भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने तो डावलून प्रवेशास हिरवा कंदील दिल्याचे समजते.
महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवत भाजपने नियोजनबद्ध मोर्चेबांधणी सुरू केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील आणि महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बीडकर यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. ज्या प्रभागांमध्ये भाजपची ताकद तुलनेने कमी आहे, तेथे पक्षवाढीचा विशेष आराखडा आखण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार व शरद पवार गट) तसेच शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे विरोधी पक्षांत अस्वस्थता वाढली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, हे माजी राज्यमंत्री नेमके कोण, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पुण्यात हडपसर परिसरातील बाळासाहेब शिवरकर आणि पुणे कॅन्टोन्मेंटचे माजी आमदार रमेश बागवे हे दोन माजी राज्यमंत्री म्हणून ओळखले जातात. बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे आणि शिवरकर यांचे चिरंजीव अभिजित शिवरकर हे दोघेही माजी नगरसेवक असून, आगामी महापालिका निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.
आज होणाऱ्या या प्रवेशामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे आणखी बदलणार असून, काँग्रेससाठी ही मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *