सरकार पडल्याचा राग, पटाेलेंच्या शहाणपणावर शिवसेनेच्या पाठाेपाठ राष्ट्रवादीचेही प्रश्नचिन्ह!

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार पडले किंवा पाडले गेले त्यामागे अनेक कारणे असली तरी मुख्य कारण म्हणजे, विधानसभा अध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी दिलेला तडकाफडकी राजीनामा. पटोले यांचा राजीनामा हा शहाणपणाचा निर्णय नव्हता, अशी भूमिका ‘सामना’मधून मांडली गेली हाेती. राष्ट्रवादी काॅंग्रेसनेही पटाेलेंच्या शहाणपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सरकार पडल्याचा राग व्यक्त केला आहे. पटाेलेंच्या राजीनाम्यानंतरच संकटाची मालिका सुरू झाली, ती नंतर थांबली नाही.  नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता, तर पुढचा पेच प्रसंग टाळता आला असता असे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले हाेते. याचीच राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही ओढली आहे.

वळसे-पाटील म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा व्हायला हवी होती. वास्तविक नाना पटोले यांनी त्यावेळी अध्यक्ष पद सोडायला नको होते. त्यांनी जर अध्यक्षपद सोडलं नसतं तर हे सर्व घडलं नसतं. 04 फेब्रुवारी 2021 राेजी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडीने बहुमताची खात्री नसल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक वारंवार टाळली. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार हाेता. मात्र, शिंदे गटाच्या आमदारांच्या बंडानंतर उपाध्यक्षांच्या निर्णयावर न्यायालयात प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.