गाेंदिया : देवेंद्र फडणवीस हे माझे लहान भाऊ आहेत, मित्र आणि शुभचिंतक आहेत. ते दूरदर्शी कर्तबगार आणि डायनामिक नेते आहेत, अशा स्तुतीसुमनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहर भाई पटेल यांच्या 117 व्या जयंती निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रफुल पटेल यांनी निमंत्रण दिल्यानंतर फडणवीस मनोहर पटेल यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ते आले होते. आजच्या कार्यक्रमात अभिनेते जॅकी श्राॅफ, माजी खासदार विजय दर्डा यांची उपस्थिती होती.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, आपल्याला एकसंघ हाेऊन विदर्भाचा विकास करायचा आहे. त्यामध्ये राजकारण काेणीही आणू नये. आम्ही अजिबात आणत नाही. मला अभिमानाने सांगावेसे वाटते की, नागरी विमान वाहतूक मंत्री हाेताे. काेठेही चांगले काम झाले की, मला अभिनंदनाचा पहिला एसएमएस देवेंद्र फडणवीस यांचा यायचा. एखादा माणूस जेव्हा दुसऱ्या माणसाच्या कामाची तारीफ करताे, तेव्हा वाटते की पक्षाच्या बाहेर विचार करताे. आपण सगळ्यांनी प्रण करायला हवा की सगळ्यांनी एकत्र येऊन विदर्भाच्या भावी पिढीला नवी दिशा द्यायला हवी.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी इथे आहे आणि प्रफुल्ल पटेलही इथे आहेत तर चर्चा तर होणारच आणि बात निकली है तो दूर तक जायेगी. त्याची चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे की, राजकारणात विचारांचा विरोधी असतो व्यक्तीचा नाही. निवडणुकीत आम्ही एकमेकांविरोधात उभे राहू पण नंतर सोबत चहाही घेवू शकतो. एकाच मंचावर येऊ शकतो. जोपर्यंत ही संस्कृती आपल्यासोबत आहे, तोपर्यंत आपल्या विकासाला कुणी रोखू शकत नाही. तुम्ही जे काम करता ते चांगले आहे. आम्हाला जेव्हाही गरज पडेल आम्ही तुमच्या सोबत राहू.
समृद्धी हायवे गोंदीयापर्यंत आम्ही आणणार आहोत. नागपूर-गोंदीया हे अंतर एक तासात कापता येईल. तोच हायवे पुढे गडचिरोलीतही नेणार आहोत. या महामार्गाची कनेक्टिव्हीटी विदर्भात करणार असल्याने आता अन्यधान्य उत्पन्न आणि व्यवहाराला चालना मिळेल, असेही फडणवीस म्हणाले. विजय दर्डा म्हणाले, फडणवीस जिथेही जातात काहीतरी घेऊन जातात. मागील काही वर्षात राजकारणात काय काय झाले आहे. हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस कुठेही असेच जात नाही आणि असेच येत नाही.
