पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा गेल्या महिन्याभरातील दुसरा मुंबई दौरा आहे. याआधी 19 जानेवारीला नरेंद्र मोदींनी मुंबईत विविध विकास कामांचा शुभारंभ आणि दोन मेट्रोचं लोकार्पण केलं होतं. यानंतर 21 दिवसांत नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपा मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे.दरम्यान आजच्या मुंबई दौऱ्यात नरेंद्र मोदींच्या हस्ते दोन वंदे भारत गाडय़ांना हिरवा झेंडा दाखवला जाईल. तसंच पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सैफी अकादमीच्या अंधेरी पूर्व येथील संकुलाचे उद्घाटन होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दोन वंदे भारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवतील. यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपासचं लोकार्पण होईल. यानंतर संध्याकाळी 4.30 वाजता पंतप्रधान अल्जामिया-तुस-सैफियाहच्या भागाचं उद्घाटन करणार आहेत. अल्जामिया-तुस-सैफियाह दाऊदी बोहरा समुदायाची प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. सैयदाना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या मार्गदर्शनात ही संस्था बोहरा समुदायाच्या शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्वीटच्या माध्यमातून वाहतुकीतील बदलाची माहिती दिली आहे. त्यानुसार कुलाबा, रिगल जंक्शन आणि पी डमेलो रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंतच्या वाहतुकीवर दुपारी २ ते ४ या वेळेत काही प्रमाणात परिणाम होईल. त्याचबरोबर, देशांतर्गत विमानतळ ते मरोळपर्यंत उन्नत मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीत दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या वेळेत किंचित बदल केला जाणार आहे.