राहूल कलाटे यांनी धुडकावला उद्धव ठाकरे यांचा आदेश

शिवसेना पक्षप्रमुख ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उद्धव ठाकरे यांनी फोनवर चर्चा करूनही चिंचवड मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार राहूल कलाटे यांनी आदेश धुडकावत उमेदवारी कायम ठेवली आहे.शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी कलाटे यांची मनधरणी करण्याचा आज सकाळीच प्रयत्न केला होता. त्याचबरोबर स्वतः उद्धव ठाकरे यांनीही फोनवर चर्चा केली.

कलाटेंनी महाविकास आघाडीकडून तिकीट मिळालेले राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांना पाठिंबा दिला आणि चिंचवड पोटनिवडणुकीत जर परिवर्तन झालंच अन काटे निवडून आले तर पुढील निवडणुकीमध्ये ही राष्ट्रवादीकडून या मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो. हीच भीती कलाटेंना आहे त्यामुळे कलाटेंनी आपली या मतदारसंघातील ताकद आणि पकड दाखवण्यासाठीच अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात २०१९ ला राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून सर्व पक्षांचा पाठिंबा मिळून कलाटे यांनी सुमारे एक लाख १३ हजार मते मिळवली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने पक्षाची ताकद शहरात क्षीण झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील मोठी ताकद म्हणून कलाटेंकडे बघितले जात. शिवसेनेच शहरातील अस्तित्व आणि कलाटेंनी व्यक्तिगत ताकद कमी होणे शिवसेनेला परवडणार नाही. त्यामुळे शिवसेनेकडून देखील कलाटेंना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी फारसा आग्रह केला गेला नाही अशीही चर्चा आहे.

चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर चिंचवडमधून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राहुल कलाटे यांचे नाव आघाडीवर होतं. मात्र राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आयात उमेदवाराला उमेदवारी देण्यास नाराजी व्यक्त केल्याने अजित पवारांनी ही जागा राष्ट्रवादीकडे खेचत राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे कलाटेंनी अपेक्षेप्रमाणे आपला अपक्ष अर्ज भरत या निवडणुकीत दंड थोपटले आहे. यामुळे चिंचवडमध्ये ही लढत भाजपच्या अश्विनी जगताप महाविकास आघाडीचे नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्यात रंगणार आहे.