12 तारखेला कुणाचे वाजणार बारा? नरेश म्हस्के यांची पोस्ट व्हायरल

ठाण्यात सुटलाय तुफान वारा,12 तारखेला कुणाचे वाजणार बारा? अशा कवितेच्या ओळी असलेल्या पोस्टची सध्या ठाण्यात तुफान चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ही कविता ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्यातून त्यांनी राष्ट्रवादीला खिंडार पडणार असल्याचा सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं टेन्शन वाढलं आहे. ठाण्यात जितेंद्र आव्हाडांना अव्हॉईड करून बरेच नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेना या पक्षात प्रवेश करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहेत. आव्हाड आणि त्यांच्या कंपूला कंटाळून ही मंडळी आमच्यासोबत येत आहेत. त्यामुळेच येत्या 12 तारखेला आम्ही त्यांचे बारा वाजवणार आहोत, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि इतर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची अचानक बैठक बोलावली होती. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि पदाधिकारी यांना 1 ते 2 कोटीची ऑफर दिल्याचा दावा केला होता.

अशातच राष्ट्रवादीला खिंडार पडू नये यासाठी अजित पवार यांनी पळापळ केली होती. अजित पवार यांनी खबरदारी घेतल्यानंतरही राष्ट्रवादीला खिंडार पडताना दिसत आहे. याचे संकेत शिंदे गटाचे ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. नरेश म्हस्के यांनी यासंबधी ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.