विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 2019 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सकाळी घेतलेल्या शपथविधी आजही जोरदार चर्चा होत असल्याचे पाहायला मिळते. चार वेळा उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागलेल्या अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी न मिळाल्याने पक्षासह कार्यकर्त्यांमध्येही नाराजी असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. मात्र, आता अजित पवार यांना पुढचे मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादीच्या आमदाराने केलं आहे. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“कोणाला काहीही आवडेल पण तुमची तेवढी संख्या असली पाहिजे ना? जर आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर आमच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. पण आज आमच्याकडं शक्ती नाही, संख्या नाही. त्यामुळं त्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही” राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी नुकतंच कार्यकर्त्यांना उद्देशून एक जाहीर विधान केलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं की, “आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल आपल्यालाला आता अजितदादांना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळं कामाला लागा” विशेष म्हणजे अजित पवारांसमोरच त्यांनी हे विधान केलं होतं. लंकेबरोबरच राष्ट्रवादीच्या इतरही अनेक आमदारांची आणि कार्यकर्त्यांनी अशीच इच्छा असल्यानं लंकेंच्या या विधानाची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे.
