मराठी विद्यापीठ स्थापनेचे स्वप्न 85 वर्षांनी देवेंद्र फडणवीस यांनी केले पूर्ण

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर यामहानुभाव पंथाच्या प्रमुख केंद्राच्या ठिकाणी मराठी विद्यापीठ स्थापन करण्याची घाेषणा केली आहे. मराठी विद्यापीठ स्थापनेचा पहिला ठरावच ८५ वर्षांपूर्वी नागपूरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झाला हाेता. मराठी भाषाप्रेमींचे स्वप्न फडणवीस यांनी पूर्ण केले आहे.


नागपुरमध्ये  १९३४ मध्ये कृ. प्र. खाडिलकरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या १९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी महाराष्ट्र विद्यापीठ स्थापनेचा ठराव मांडला हाेता. विशेष म्हणजे  साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने मराठी विद्यापीठ स्थापनेची शिफारस केली हाेती. चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या भाषा सल्लागार समितीने एक फेब्रुवारी २०१३ रोजी त्यांनी स्थापनेचा ठराव केला हाेता. मात्र, तत्कालीन काॅंग्रेस- राष्ट्रवादी काॅंग्रेस आघाडी सरकारने त्यावर कार्यवाही केली नाही.


देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेतील आद्य साहित्यिक अशी ओळख असलेल्या चक्रधर स्वामींच्या नावाने रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ  स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. मराठीतील पहिला आद्यग्रंथ म्हणून ओळख असलेला लीळाचरित्र हा ग्रंथ रिद्धपूरमध्ये उदयास आला. म्हाइंभटानी तो वाजेश्वरी या ठिकाणी लिहिला असल्याची नोंद आहे. मराठी साहित्याला महानुभाव पंथीयांचा मोठा वारसा लाभला असून महानुभाव पंथाशी संबंधित जवळपास 30 हजार ग्रंथ असल्याची नोंद आहे.


रिद्धपुर हे अमरावती जिल्ह्यात असून श्रीक्षेत्र रिद्धपूर ही महानुभावपंथांचीच नव्हे, तर मराठी वाङ्मयाचीसुद्धा काशी म्हणून ओळखली जाते. या भूमिमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ लिहिला गेला. याठिकाणी लीळाचरित्रासह स्मृतिस्थळ, गोविंदप्रभू चरित्र, दृष्टांतपाठ, सूत्रपाठ, मूर्तीप्रकारासारखे ग्रंथ लिहिले गेले.त्याचप्रमाणे सहा हजारहून अधिक ग्रंथ या ठिकाणी लिहले गेल्याने या भूमीला विशेष महत्व आहे.