पुणे : महाविकास आघाडीत अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने संशय वाढला होता. मात्र आता अजित पवार यांनीच याबाबत खुलासा केला आहे.
खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजीत कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. 18 एप्रिल 2023 रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमीत कामकाज सुरु राहणार आहे.
मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्यापूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. आज सासवड येथे अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला अजित पवार आले नाहीत.
आज सकाळी 8 वाजेपासून वडकी, फुरसुंगी या भागातील काही दुकानांचे उद्घाटन अजित पवार करणार होते, त्या ठिकाणीही अजित पवार आलेले नाहीत सासवड येथील मेळाव्याला अजित पवार यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे अचानक समजल्याने नागरिकांमध्येही तर्क वितर्क सुरू झाले.
