‘माझ्या कुटुंबावर काळाने घाला घातला, त्याचं राजकारण करु नका’ – आप्पासाहेब धर्माधिकारी

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्री सेवकांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यू बद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा लाखो श्रीसेवकांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला होता. त्यावेळी उष्माघाताने 13 श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याने पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागले. त्यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. श्री सेवकांचा झालेला हा मृत्यू क्लेषदायक आहे. या घटनेवर कोणीही राजकारण करू नये असे आवाहनही आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान घडलेल्या घटनेबाबत आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. आप्पासाहेबांनी परिपत्रकाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी असे सांगितले की, ‘महाराष्ट्र शासानाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सारे श्री सदस्य हे माझ्या कुंटुबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे.’

त्यानंतर आज राज्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी रुग्णालयात जात श्री सेवकांच्या प्रकृतीची चौकशी केली. महाराष्ट्र शासनाने कार्यक्रम सायंकाळच्या वेळी ठेवला असता तर ही दुर्दैवी वेळ आलीच नसती, अशी प्रतिक्रिया देत राज्य शासनावर अनेकांनी ताशेरे ओढले.