भाजपने महाविकास आघाडीच्या सभेवरुन जोरदार टीका केली होती. भाजप नेते आशिष शेलार यांनी ‘मैदान छोटे, आकडे खोटे आणि राऊतांसारखे भोंगे फक्त मोठे’, असे म्हणत ‘मविआ’वर हल्लाबोल चढवला होता. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वज्रमूठ सभेनंतर खचाखच भरलेल्या मैदानाचा फोटो ट्विट करत भाजपच्या चिनी नजरेतून सगळ्यात लहान मैदानावरची लहान सभा पाहा, असा पलटवार केला आहे.
“आमचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भीतीने तीन पक्ष एकत्र आलेत. त्याला हे वज्रमूठ वगैरे म्हणतात. पण ही दुर्बळांची भयभीत सभा आहे. तिघे एकत्र आले तरी अजूनही भय संपले नाही. गोळाबेरीज सुरूच आहे. दुसरं कारण मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराची जंत्री भविष्यात उघड होणार म्हणून अगोदरच झोळी पसरून सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे यांची वज्रमूठ”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
आशिष शेलार म्हणाले, जे मैदान ग्राहकोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनालाही कमी पडते, एकट्या भाजपाची सभा असते तेव्हा व्यवस्थेला जे मैदान वापरावे लागते अशा बीकेसीतील सर्वात छोट्यातील छोट्या मैदानात तीन पक्षांची सभा होत आहे. ही वज्रमुठ? असे म्हणत शेलारांनी खोचक सवाल उपस्थित केला होता.
