सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या ‘चिमणी’वर हातोडा पडणार; चिमणी पाडण्यासाठी संचारबंदी जारी

सोलापूरच्या विमानसेवेला कथित अडथळा ठरलेली श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या चिमणीचे अनधिकृत ठरविण्यात बांधकाम पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी प्रशासनाने कारखान्या एक किलोमीटर परिसरात फौजदारी दंड संहिता कलम १४४ नुसार संचारबंदी पुकारली आहे. यात परिसरातील सर्व हाॕटेल, बार, मंगल कार्यालये, सभागृहे तसेच धार्मिकस्थळे आणि प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान, या कारवाईमुळे हजारो सभासद शेतकरी बांधव देशोधडीला लागणार आहे. कारखान्याने 30 मीटरची एन.ओ.सी महापालिकेला दिलेली असताना सुध्दा ही कारवाई होत आहे. त्यामुळं हा अन्यायकारक निर्णय होत असून, एक सहकार चळवळ उद्धवस्त करण्याचे काम महापालिका प्रशासन करत असल्याची खंत कारखान्याचे तज्ज्ञ संचालक धर्मराज काडादी यांनी व्यक्त केली.

बुधवारी दुपारपासून पुढील आदेश येईपर्यंत ही संचारबंदी राहणार आहे. पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी हा संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. याशिवाय कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी व अध्यक्ष पुष्कराज काडादी यांच्यासह सर्व संचालक मंडळ तसेच सिध्देश्वर साखर कारखाना चिमणी बचावो संघर्ष समितीच्या प्रमुख नेत्यांना नजरकैदेत ठेवण्याच्या हालचालीही सुरू झाल्याचे सांगण्यात आले. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची ही को जनरेशन प्लांटची चिमणी आहे. 2014 साली कारखान्याने ही चिमणी उभारलेली असून साधारण 90 मीटर इतकी उंची आहे. चिमणीच्या या उंचीमुळे शेजारी असलेल्या सोलापूर विमानतळावरून विमान सेवा सुरू करता येऊ शकत नाही असा अहवाल डीजीसीएने दिला होता. सोलापूरला विमानसेवा गरजेची असल्याने ही चिमणी हटवण्याची मागणी सोलापूर विकास मंच आणि सोलापूर विचार मंच या संघटनानी केली होती. त्यातच सोलापूर महानगरपालिकेने सदरील चिमणी अनधिकृत असल्याचे ठरविले. कारवाईच्या हालचाली सुरु केल्या.