उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य काल मोदी @9 महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसाठी भाजपाची दारं उघडीच आहेत असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, केशव प्रसाद मौर्य यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं व्यक्तिगत आहे. उद्धव ठाकरेंकरता आमचे सर्व दरवाजे बंद आहेत. आम्ही त्यांच्याशी कोणतीही चर्चा करत नाही. त्यांच्याशी कधीही, कुठलीही चर्चा करणारच नाही.
यावेळी बावनकुळे म्हणाले, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने जे काही केलं (कर्नाटक सरकारे धर्मांतरविरोधी कायदा रद्द केला आहे, तसेच, अभ्यासक्रमातून वीर सावरकरांचा धडाही वगळला आहे.)आहे, त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडावी. किमान त्यांच्या मुखपत्रातून त्यांनी याबाबतची भूमिका उद्या छापली पाहिजे. कर्नाटकात काँग्रेस जे काही करतंय त्याबद्दल उद्धव ठाकरेंची भूमिका महाराष्ट्राला समजली पाहिजे.
भारत जोडो यात्रेत राहुल गांधीनी वारंवार सावरकरांचा अपमान केला. आणि आता कर्नाटक सरकारने सावरकरांच्या इतिहासाचे धडे वगळून टाकले. पुढच्या काळात गो हत्या बंदीचा कायदाही रद्द करुन गायींची कत्तल करण्याचीही परवानगी देतील असे बावनकुळे म्हणाले.आता उध्दव ठाकरे यांनी लंडनमधून किंवा महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी कर्नाटक सरकारने घेतलेला निर्णय मान्य आहे का? आणि या नंतरही शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का, हे महाराष्ट्रातील जनतेला सांगावे असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या मनात काही असेल तर ते त्यांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मांडावे. भाजपाचे दरवाजे बंद नाहीत. मात्र, ठाकरेंनी आता पुढाकार घेतला पाहिजे. चर्चा केली पाहिजे. भाजप स्वतःहून चर्चेचा प्रस्ताव ठेवणार नाही.असं वक्तव्य उत्तर प्रदेश चे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केले.
