महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाल अत्यंत पोषक वातावरण असून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आता झाल्या तर सव्वाशे जागा मिळतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी चांगली होणार असली तरी ठाकरे गटाला जनता पूर्ण नाकारण्याच्या मनःस्थितीत असून केवळ 17 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज न्यूज एरिना इंडिया’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे.राज्यातील 35 टक्के जनतेने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून कौल दिला आहे.
नुकत्याच झालेल्या कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये ‘न्यूज एरिना’ने केलेल्या पाहणीचे अंदाज बरोबर आले होते. त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कर्नाटकमध्ये काँग्रेसने बहुमत मिळविले होते. महाराष्ट्राबद्दल केलेल्या पाहणीमध्ये भाजपला आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे 123 ते 129 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसल 55, तर काँग्रेसला 50 ते 53 जागा मिळणे अपेक्षित आहे. शिवसेना ठाकरे गटाला 17 ते 19 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढविली, तर काँग्रेसला सर्वाधिक फायदा होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आघाडी नसेल, तर काँग्रेसला २८ ते ३० जागाच मिळू शकतील, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाकरे गटापेक्षा मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. त्यांना 25 जागा मिळतील. मुस्लिम समाज पूर्णपणे एआयएमएमआयच्या पाठीशी उभा राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे एआयएमएमआयच्या जागाही वाढणार आहेत. या सर्वेक्षणातील धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या जागा थोड्या वाढणार असल्या तरी ठाकरे गटाची साथ त्यांना मिळणार नाही. कारण कोकणाबाहेर ठाकरे गटाचा प्रभाव राहिलेला नाही.
सर्वेक्षणातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सर्वाधिक 21 टक्के लोकांनी अशोक चव्हाण यांना पसंती दिली आहे. अजित पवार यांना 14% तर एकनाथ शिंदे यांना 12% लोकांनी कौल दिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तर केवळ 9 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंत केले आहे.
