वीजेपासून बचावासाठी भारत सरकारचे ‘दामिनी’ ॲप; वीजेपासून बचाव करण्यासाठी ॲप उपयोगी

खरीप हंगामाची लगबग आता सुरू झाली आहे. बी-बियाण्यांची खरेदी हा शेतकऱ्यांसाठी जितका महत्वाचा विषय, तितकाच वीजेमुळे होणारी जीवितहानी हा चिंतेचा विषय. जून-जुलै महिन्यात वीज पडून जीवितहानी घडण्याचे प्रकार संपूर्ण देशभरात घडतात. भारतात वीज पडल्यामुळे दरवर्षी दोन हजारांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे मग वीजेपासून बचाव करण्याच्या उद्देशानं भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं ‘दामिनी’ ॲप तयार केले आहे. तुम्ही ज्या भागात राहता, त्या भागात पुढच्या 15 मिनिटांत वीज पडणार की नाही, ते या ॲपच्या माध्यमातून समजते.

महाराष्ट्रात वीज पडून मृत्यू झाल्याच्या बातम्या वारंवार कानावर येतात. दरवर्षी अनेक शेतकरी आणि जनावरं यांना वीज पडल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो. झाडं, इमारती यांचंही नुकसान होतं. त्यामुळे वीज अंगावर पडू नये, यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर काळजी घेणं गरजेचं असतं.भारतात वीज पडल्यामुळे दरवर्षी दोन हजारांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे मग वीजेपासून बचाव करण्याच्या उद्देशानं भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं दामिनी ॲप तयार केले आहे. तुम्ही ज्या भागात राहता, त्या भागात पुढच्या 15 मिनिटांत वीज पडणार की नाही, ते या ॲपच्या माध्यमातून समजते.

दामिनी ॲप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे.ते डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर ‘Damini : Lightning Alert’ असं सर्च करायचं आहे. हे ॲप डाऊनलोड केलं की जीपीएस लोकेशन ऑन ठेवण्यासाठी परवानगी द्यायची आहे. त्यानंतर हे ॲप तुमचं लोकेशन शोधेल आणि तुमच्या ठिकाणापासून 40 किलोमीटरच्या अंतरापर्यंत एक वर्तुळ काढेल. आणि मग तुमच्या भागात पुढच्या 15 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता आहे की नाही ते सांगेल. या प्रक्रियेसोठी थोडा वेळ लागेल. वीज पडणार नसेल, तर No Lightning Warning किंवा बिजली की चेतावनी नही, अशी सूचना तिथं दिलेली असेल. पण जर वीज पडणार असेल आणि त्या वर्तुळात लाल रंग दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या भागात पुढच्या 5 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते. वर्तुळात पिवळा रंग दिसत असेल, तर 5 ते 10 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते आणि निळा रंग असेल, तर 10 ते 15 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते.

दामिनी ॲपच्या वापरासंदर्भात कृषी विभागही स्थानिक पातळीवर शेतकरी बांधवांना आवाहन करताना दिसून येत आहे. कृषी विभागाच्या सूचनेनुसार “दामिनी ॲप शेतकऱ्यांसाठी फार उपयोगी आहे. कारण वीज कुठे आणि किती वेळात पडणार याची पूर्वसूचना हे ॲप देत असतं. वीज पडण्याच्या 15 मिनिटे आधी सुरक्षित ठिकाणी जाण्याचे संकेत हे ॲप देतं. त्यामुळे मग शेतात काम करत असलो तर बैल-बारदाणा घेऊन आपण सुरक्षित स्थळी जाऊ शकतो. “शेतकरी बांधव नियमितपणे शेतात काम करत असतात. त्यांच्या कामात ते व्यग्र असतात. अचानकपणे वीज पडते आणि अपघात होतात. हे टाळायचं असेल तर हे ॲप डाऊनलोड करून त्याचा उपयोग करणं फार गरेजचं आहे. शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करावा”