एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेतील बंडाला आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे. शिवसेनेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे बंड होते. त्यामुळे ठाकरे गटाकडून हा दिवस गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीही हा गद्दार दिवस साजरा करणार आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी गद्दारी केली असा आरोप महाविकास आघाडीकडून आणि विशेषत: शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केला जातो. त्याचा आधार घेत राष्ट्रवादी गद्दार दिन साजरा करणार आहे.गद्दार दिवस म्हणून राष्ट्रवादीच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात येत आहे. खोके ठेवत ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून शिंदे गटाचा निषेध करण्यात येत आहे. मात्र असा कुठलाही दिवस साजरा करण्यास मुंबई पोलिसांकडून प्रतिबंध करण्यात आली आहे. तर मुंबई पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देखील पाठवण्यात आल्यात.
ठाकरेंनी गद्दार दिवस साजरा केलाच पाहिजे. कारण बाळासाहेबांच्या विचाराशी त्यांनी गद्दारी केली आहे. बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांवर त्यांनी लोळण घेतलं आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी हे सगळं केलं आहे. त्यामुळे त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली आहे. त्यामुळे त्यांनी गद्दार दिवस साजरा करावा. स्वत: साठी त्यांनी हा दिवस साजरा केलाच पाहिजे, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.
बाळासाहेब ठाकरे बोलले होते की, मला एक दिवस पंतप्रधान करा. मी 370 कलम रद्द करतो. मी राम मंदिर बांधून दाखवतो. ते स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं आहे. बाळासाहेबाांबद्दल मोदींना किती आदर आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे, असंही केसरकर म्हणालेत.बाळासाहेबांनी सांगितलं होतं की, 80 टक्के समाजकारण 20% राजकारण. ठाकरे गट हे सगळं विसरला आहे. ते शंभर टक्के फक्त राजकारण करत आहेत. 100% राजकारण करणाऱ्यांना आम्हाला उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही. आम्ही कामातून त्यांना चोख उत्तर देऊ, असं केसरकर म्हणालेत.
