आषाढी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये आज देवाचा पलंग काढण्यात येणार आहे. त्यामुळे आजपासून देवाचे राजोपचार बंद होणार असून भाविकांसाठी २४ तास विठूमाउलीचं दर्शन घेण्याची व्यवस्था होणार आहे. विठ्ठल रुक्मिणीचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होते. आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. या सर्वांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. यामुळे देवाची झोप बंद होते, अशी प्रथा आहे.
२० जून ते ७ जुलै दरम्यान १७ दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. या दरम्यान देवाचे नित्योपचार बंद राहणार आहेत. आषाढी यात्रा आता आठवडाभरावर राहिली आहे. या पाश्र्वभुमीवर लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. तसेच विठुरायाच्या दर्शनासाठी आतापासून ७० हजाराहून अधिक भावित रांगेत लागले आहेत. शिवाय आता आषाढीनिमित्ताने पुढील काही दिवसात भाविकांच्या गर्दीत अजून मोठ्या प्रमाणात वाढ होवू शकते. यामुळे सर्व भाविकांना विठुरायाचे चांगले दर्शन व्हावे; याकरीता २४ तास दर्शनाची सुविधा सुरू केली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक येत असतात. यावेळी मोठी गर्दी होऊन प्रत्येकाला पदस्पर्श दर्शन घेता येत नाही. त्यामुळे मंदिर समितीने प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावे यासाठी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 20 ते 7 जुलै दरम्यान विठ्ठल मंदिर चोविस तास तास खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
